लंडनमधील घर खरेदीसाठी तीन कोटी अदा
By admin | Published: April 14, 2015 01:06 AM2015-04-14T01:06:08+5:302015-04-14T01:06:08+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थीदशेत वास्तव्य केलेले लंडनस्थित घर खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने ३ कोटींची अग्रीम रक्कम (अॅडव्हान्स) संबंधितांच्या खात्यात जमा केली आहे.
मिलिंदकुमार साळवे - श्रीरामपूर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थीदशेत वास्तव्य केलेले लंडनस्थित घर खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने तातडीने ३ कोटींची अग्रीम रक्कम (अॅडव्हान्स) संबंधितांच्या खात्यात जमा केली आहे. घर खरेदीच्या पुढील कार्यवाहीसाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय शिष्टमंडळ १६ एप्रिलला लंडनला जाणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या पुढाकारानंतर, बाबासाहेबांनी १९२१-२२मध्ये वास्तव्य केलेली लंडनस्थित (१० किंग्ज हेन्रीरोड, एन. डब्ल्यू. ३) वास्तू खरेदी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने तत्त्वत: मान्यता दिली. १ सप्टेंबर २०१४ रोजी ही वास्तू विक्रीस काढली होती. त्यानंतर राज्य सरकारने ही वास्तू खरेदी करण्यास स्वारस्य असल्याचे अधिकृतरीत्या संबंधितांना कळविले. अपेक्षित दराच्या १० टक्के रक्कम तातडीने अदा करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या भागभांडवलातून
तरतूद करण्याचा निर्णय झाला. तसेच हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी लंडनमधील सॉलिसिटर मेसर्स सेडॉन यांची नियुक्ती करण्यात आली. महामंडळाने तातडीने १० टक्के रक्कम म्हणून ३ कोटी १० लाख रुपये सॉलिसिटर सेडॉन यांच्या बँक खात्यात जमा केले.
घर खरेदीच्या पुढील कार्यवाहीसाठी सामाजिक न्याय मंत्री बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे व या खात्याचे प्रधान सचिव उज्ज्वल उके १६ ते २२ एप्रिलदरम्यान लंडनला जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्यास परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. राज्य सरकारने या विदेश दौऱ्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून १५ लाख रुपये मंजूर केले आहेत. या दौऱ्यात खरेदीच्या पुढील व्यवहारावर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे.