तूर खरेदीची चौकशी करणार
By admin | Published: April 26, 2017 02:19 AM2017-04-26T02:19:22+5:302017-04-26T02:19:22+5:30
राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनीच तुरीची विक्री नाफेडला करीत, स्वत:चे चांगभलं करून घेतल्याचे वृत्त आज ‘लोकमत’ने दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांनीच तुरीची विक्री नाफेडला करीत, स्वत:चे चांगभलं करून घेतल्याचे वृत्त आज ‘लोकमत’ने दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत, या प्रकरणी चौकशीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रांवर आणलेल्या संपूर्ण तुरीची खरेदी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आतापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या ४० लाख क्विंटल तुरीपैकी निम्मी तूर ही व्यापाऱ्यांनी कमी भावाने शेतकऱ्यांकडून आधीच खरेदी करून नंतर नाफेडला ५ हजार ५० रुपये क्विंटलने विकल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज कृषी, पणन, सहकार आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मंत्रालयात घेतली.
केंद्रावर आलेल्या शंभर शेतकऱ्यांपैकी कोणत्याही दहा शेतकऱ्यांची नावे निवडून चौकशी केली जाईल. सॅटेलाइटचा उपयोग करण्यात येईल. केंद्रावर आलेला माल त्या शेतकऱ्याचाच होता की, त्याच्या नावावर व्यापाऱ्यांनी मलिदा लाटला, हे चौकशीतून उघड होईल व तसे असल्यास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)
शेतकरी उत्पादक कंपन्यांतही व्यापाऱ्यांनीच लाटला मलिदा!
नाफेडच्या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या नावे व्यापाऱ्यांनीच तूर टाकून कोट्यवधी रुपये कमावल्याचा गंभीर आरोप होत असताना, आता शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रांवरही व्यापाऱ्यांनीच तूर विकून मलिदा लाटल्याचे आरोप होत आहेत. नाफेड व्यतिरिक्त ११७ शेतकरी उत्पादक कंपन्यांना तूर खरेदीचे अधिकार देण्यात आले होते.
व्यापाऱ्यांनी कमी भावाने शेतकऱ्यांकडून (तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटल) तुरीची खरेदी केली आणि नंतर तीच तूर शेतकऱ्यांच्या नावावर शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी केंद्रांवर ५ हजार ५० रुपये दरात विकली आणि प्रचंड नफा कमावल्याचे म्हटले जाते. या प्रकरणी चौकशी झाल्यास धक्कादायक माहिती समोर येऊ शकते.
मंत्रालयाच्या दारात विक्री
यवतमाळ, करमाळा, पंढरपूर येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुुटुंबातील महिलांनी आणलेली तूरडाळ मंत्रालयाजवळ विकण्याचे आंदोलन आज जनता दल युनायटेडने केले. तासभरात शंभर किलो डाळ विकण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आ.कपिल पाटील यांच्या नेतृत्वात सरकारी अनास्थेचा निषेध करण्यात आला.
राज्यात आतापर्यंत ४० लाख क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली असून, आणखी १० लाख क्विंटल तुरीची खरेदी केली जाईल. २२ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांनी केंद्रांवर आणलेल्या (ज्यांना टोकन दिलेले आहेत अशा) सर्व तुरीची खरेदी करण्यात येईल, अशी हमी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
आतापर्यंत ५ हजार ५० रुपये क्विंटल या आधारभूत किमतीने २ लाख ५८ हजार शेतकऱ्यांची ४० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. त्याची किंमत १ हजार ८३९ कोटी रुपये इतकी आहे. आणखी तूर खरेदीसाठी राज्य शासन एक हजार कोटी रुपये देणार आहे.