22 एप्रिलपर्यंत आलेल्या तुरीचीच खरेदी - मुख्यमंत्री
By admin | Published: April 24, 2017 03:47 PM2017-04-24T15:47:08+5:302017-04-24T15:47:08+5:30
नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांची तूर आली, ती खरेदी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांची तूर आली, ती खरेदी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली आहे.
शनिवारपासून नाफेडने तूर खरेदी बंद केली. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली.
या भेटीनंतर, नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर 22 एप्रिलपर्यंत ज्या शेतकऱ्यांची तूर आली, ती खरेदी करण्यात यावी. बाहेरुन येणाऱ्या तुरीवरील इम्पोर्ट ड्युटी 10 टक्क्यांवरुन 25 टक्क्यांवर करावी. तसेच, तूर खरेदीसाठी योग्यरित्या धोरण आखण्यात यावे, अशी मागणी करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, नाफेडने तूर खरेदी बंद केल्याने राज्यातील लातूर, सोलापूर, अकोला, हिंगोली, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यांतील तूर उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने लग्नकार्य तसेच आगामी खरीप हंगामासाठी बी बियाणे, खते याची जुळवाजुळव कशी करावी, या आर्थिक विंवचनेत शेतकरी सापडला आहे.
यावर्षी चांगला पाऊस झाल्याने राज्यात तुरीचे उत्पादन वाढले. मात्र, परंतु, खुल्या बाजारपेठेमध्ये तुरीचा भाव गडगडला. कमी दराने तुरीची खरेदी व्यापाऱ्यांनी सुरु केली. त्यामुळे डिसेंबर महिन्यात शासनाने हमीभाव तूर खरेदी केंद्रे सुरु केली. खरेदी केंद्रासमोर सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांच्या रांगा होत्या. मात्र, कधी बारदाना, तर कधी साठवणुकीचे कारण पुढे करत या केंद्रांवरील खरेदी थांबवण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांकडील सगळी तूर खरेदी झालीच नाही.