‘देशातही संघाचा छुपा अजेंडा राबविण्याचा हेतू’
By admin | Published: December 3, 2015 12:44 AM2015-12-03T00:44:08+5:302015-12-03T00:44:08+5:30
देशातील विविध घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन देशाला घातक आहे. गुजरातप्रमाणेच देश चालवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा या मौनामागे असून, यामुळे देशातील
पुणे : देशातील विविध घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मौन देशाला घातक आहे. गुजरातप्रमाणेच देश चालवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा या मौनामागे असून, यामुळे देशातील वातावरण धास्तावलेले असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. तूरडाळ घोटाळ्यात राज्याबरोबर केंद्र सरकारही सामील असल्याचा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी आमदार मोहन जोशी आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे उद््घाटन चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकार तसेच पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. केंद्रीय मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांवर, दादरीसारख्या घटनांवर पंतप्रधान प्रतिक्रिया व्यक्त करीत नाहीत, त्यातूनच संघाचा छुपा अजेंडा राबविण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो, असे चव्हाण म्हणाले.
पंतप्रधान कार्यालयाची कामकाज पद्धत मोदी यांनी बदलली आहे. ते म्हणाले, पुरस्कार वापसीवर त्यांच्याकडून केली जाणारी टीका अपरिपक्वतेचे लक्षण आहे. सतत परदेशात असणाऱ्या मोदी यांची जनतेतील विश्वासार्हता ढासळत चालली आहे. दिल्ली, बिहार व आता गुजरातमधील निवडणुकांचे निकाल त्याचेच द्योतक असल्याचा दावा चव्हाण यांनी केला. (प्रतिनिधी)
स्मार्ट सिटी बोगस योजना
स्मार्ट सिटी ही अत्यंत बोगस योजना असल्याची टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सुरूवातीला १०० त्यानंतर २० व आता तर फक्त १० शहरांचीच निवड केली जाणार आहे. कामापेक्षाही या योजनेचा प्रचारच जास्त सुरू आहे, असे ते म्हणाले.