शरद पवार आजचे शिवाजी! आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ; पुरुषोत्तम खेडेकरांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 06:04 PM2024-04-06T18:04:50+5:302024-04-06T18:06:31+5:30
मोदींना निवडून दिले म्हणून आपण पंतप्रधान मानतो परंतु मी त्याला पाहू शकत नाही, गुजरातमध्ये दंगा झाला नसता तर मोदी नावाचा माणूस देशाला माहिती झाला नसता अशी टीका सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी केली.
पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अडचण आली होती. जेव्हा जेव्हा देशासमोर अडचण आली तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला आहे. आजचे शिवाजी साहेब झालेत, आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ असं विधान मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे.
'अस्वस्थ तरुणाई आणि आश्वासक साहेब' या कार्यक्रमात पुरुषोत्तम खेडेकर बोलत होते. खेडेकर म्हणाले की, संपूर्ण देशाला आवश्यक असलेला असा हा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला आहे. जागतिक तरुणाईचं आश्वासक चेहरा शरद पवार आहेत. तुमची अस्वस्थता, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा अडचण आली होती. या देशाचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा देश अडचणीत आला तेव्हा तेव्हा महाराष्ट्र अडचणीत आलेला आहे. आजचे शिवाजी साहेब झालेत. आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ तोपर्यंत अस्वस्थता थांबणार नाही एवढे आपल्या कृतीतून आपण दाखवून द्यावे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत तुमचे प्रश्न आम्हाला माहिती आहे. तुमचे भविष्य धोक्यात आहे. जे बुद्धी चालवणार नाहीत अशी तरुणाई सत्ताधाऱ्यांना हवेत. सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे नसतात. राजकारणात सर्व गोष्टीचे अंतिम निर्णय होतात. त्यामुळे राजकारणापासून दूर राहू शकत नाही. व्यापारी लॉबी देशावर राज्य करतेय. जनतेचे देणंघेणं राहिले नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात मनोरंजनच जास्त झालंय. या स्थितीत शहाणपणानं हे आव्हान स्वीकारावं लागेल. कुठल्याही समाजावर संकट आलं तर तिथली तरुणाई हे संकट अंगावर घेत असते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आम्ही होतो. तेव्हा महाराष्ट्रात जात गायब झाली होती. आपलं द्विभाषिक राज्य होते. गुजरातचं ओझं बाजूला काढून आपल्याला मुंबईसह संयुक्त राज्य हवं होते. आव्हान स्वीकारत नाही तो तरुण असू शकत नाही असं सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी म्हटलं.
दरम्यान, देशाला व्यापारी कचाट्यातून मुक्त करायचं आहे असं हल्लाबोल करायचा आहे. आणीबाणीच्या काळात तरुणाईनं आंदोलन हाती घेतले होते. ती निवडणूक तरुणाईने हातात घेतली. आता तीच वेळ महाराष्ट्रावर आली आहे. विरोधी पक्ष कमकुवत झालेत. त्यामुळे कमळ उगवलं आहे. धर्माच्या नावाखाली लोकांचे मेंदू बंद करणे, बाकीच्या लोकांना सर्वधर्म चाललं मग आत्ताच का अडचण आली? जातीद्वेष आता वाढला आहे. सरकार खड्डणीबहाद्दर आहे. दगडाला शेंदूर फासून सत्ताधारी कुणीही उमेदवार देतात. आपला बेस्ट उमेदवार हे समजून काम केले. धंगेकर हे अनुभवातून शिकले आहेत. ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. शेतकऱ्यांचे वाटोळे केल्यानंतर शेतकरी आत्महत्या सुरू झाल्या. बहुतेक देशात स्पर्धा परिक्षांच्या मुलांच्या आत्महत्येची लाट येण्याची शक्यता आहे. इतकी निराशा आता आहे. इतका छळ सुरू आहे. पण याचेच रुपांतर पराक्रमात करता येते असं आवाहनही सप्तर्षी यांनी केले.
हिंदुत्व म्हणजे हिंसा, द्वेष
हिंदू आणि राम यांचा सुतराम संबंध नाही म्हणजे हिंदू धर्म आणि हिंदुत्वाचा बिल्कुल संबंध नाही. हिंदु धर्म सहनशीलता, प्रेम, शेजारधर्म हे शिकवतो म्हणून आजपर्यंत सगळे मित्रत्वाने राहिले. हिंदुत्व म्हणजे हिंसा, द्वेष, दुसरेच माणूसच नाहीत. मोदींना निवडून दिले म्हणून आपण पंतप्रधान मानतो परंतु मी त्याला पाहू शकत नाही. आम्ही गुजरातमध्ये दंग्यानंतर काम करायला गेलो होतो. भट्टीमध्ये ८-८ माणसं टाकली. जर तो दंगा झाला नसता तर मोदी नावाचा माणूस देशाला माहिती झाला नसता अशी टीका कुमार सप्तर्षी यांनी केली.
पुण्यात जो निवडून येतो, त्याचं सरकार देशात येते
गेल्या ३०-४० पुण्यात जो खासदार निवडून येतो, त्याचे देशात राज्य येते. पुण्यातील लोकांवर विशेष जबाबदारी आहे. कलमाडी आले तेव्हा देशात युपीए आले, इथं बापट आले तेव्हा वर मोदी आले. शिरोळे आले तर अटल येतात. त्यामुळे फक्त पुण्यात काम करून आपण देशात राज्य आणू शकतो. ते आपल्याला करायचं आहे. धंगेकर निवडून आले तर मोदी जातील आणि धंगेकर पडले तर मोदी येतील. हे सत्य लक्षात ठेवा, मतदान आपलं नसते, इतरांनाही पटवावं लागतं. परिवर्तनाची लाट तरुणांनी अंगावर घ्यावी असं आवाहन कुमार सप्तर्षी यांनी केले आहे.