ब्रँडेड धान्यावर जीएसटीविरोधात व्यापारी आंदोलनाच्या पवित्र्यात
By admin | Published: May 25, 2017 01:55 AM2017-05-25T01:55:09+5:302017-05-25T01:55:09+5:30
सर्व शेतीमाल जीएसटी मुक्त राहणार असल्याचे जाहीर करतानाच केंद्र शासनाने ब्रँडेड अन्नधान्यांवर ५ टक्के जीएसटी लागू
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सर्व शेतीमाल जीएसटी मुक्त राहणार असल्याचे जाहीर करतानाच केंद्र शासनाने ब्रँडेड अन्नधान्यांवर ५ टक्के जीएसटी लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सध्या बाजारपेठेत ९५ टक्के बँ्रडेड माल विकला जात असल्यानेही व्यापारी आणि नागरिकांची एकप्रकारे फसवणूक आहे. हा कर मागे घेतला नाही तर एलबीटीपेक्षा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा पुण्यातील व्यापाऱ्यांनी दिला आहे़
जीएसटीमधील तरतुदीबाबत लोकमत कार्यालयात आयोजित बैठकीत पूना मर्चंटस चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी या कायद्यातील त्रुटी दाखवून दिल्या़ यावेळी पुना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, उपाध्यक्ष जवाहरलाल बोथरा, सचिव अशोक लोढा, सहसचिव रायकुमार नहार, माजी अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, अजित सेटिया, फेडरेशन आॅफ असोशिएशन आॅफ ट्रेडर्सचे अध्यक्ष वालचंद संचेती उपस्थित होते़
प्रवीण चोरबेले यांनी सांगितले, की केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची मुंबईत व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली तेव्हा अन्नधान्यांवर कोणताही कर लावला जाणार नाही़ ज्या वस्तूवर वॅट आहे त्याच वस्तूंना जीएसटी लागेल, असे सांगितले होते़ प्रत्यक्षात अन्नधान्यांना जीएसटीतून वगळल्याची घोषणा करताना त्याखाली कायद्यात ब्रँडेड मालाला ५ टक्के जीएसटी लागू केला आहे़ चेंबरचे माजी अध्यक्ष वालचंद संचेती आणि पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले, की जीवनाश्यक वस्तूंमध्ये भेसळ होऊ नये, म्हणून कायदा करण्यात आला आहे़