ब्रिटनस्थित गोमंतकीयांना धक्का
By admin | Published: June 25, 2016 03:46 AM2016-06-25T03:46:40+5:302016-06-25T03:46:40+5:30
अठ्ठावीस देशांच्या युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय ब्रिटनने घेतल्यामुळे तेथे राहणाऱ्या सुमारे ६० हजार गोमंतकीयांना धक्का बसला आहे.
पणजी : अठ्ठावीस देशांच्या युरोपीय संघातून बाहेर पडण्याचा ऐतिहासिक निर्णय ब्रिटनने घेतल्यामुळे तेथे राहणाऱ्या सुमारे
६० हजार गोमंतकीयांना धक्का बसला आहे. युरोपीय संघाच्या स्थापनेनंतर पोर्तुगालमार्गे ब्रिटनमध्ये जाणाऱ्यांची संख्या खूप वाढलेली आहे. गोवा सोडून जाण्याचा हा प्रश्न गोव्यातही राजकीय आणि नाजूक बनलेला आहे.
प्रमुख सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसह सर्वच राजकीय पक्षांनी नागरिकांच्या दुहेरी नागरिकत्वाच्या मागणीचा वेळोवेळी पुुरस्कारच केलेला आहे. ब्रिटनच्या निर्णयामुळे तेथे स्थायिक गोमंतकीयांचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गोव्यातील २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही हा राजकीय मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोव्यातील बहुतेक पक्ष ब्रिटनमधील गोमंतकीयांना दिलासा देण्याच्याच प्रयत्नात अहेत.
आम्ही गोमंतकीयांबरोबर आहोत, असे सांगत गोवा सरकारने याप्रकरणी विनाविलंब टास्क फोर्स स्थापन करावा, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली. गोवा फॉरवर्ड पक्ष ब्रिटनस्थित गोमंतकीय आणि त्यांचे गोव्यातील नातेवाईक यांच्यासाठी सल्ला व पुनर्वसन केंद्र स्थापन करणार आहे. (विशेष प्रतिनिधी)