गोल्डन गँगला धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2017 05:01 AM2017-02-24T05:01:56+5:302017-02-24T05:01:56+5:30
महापालिकेतील ‘गोल्डन गँग’वर जबरदस्त प्रहार करीत भारतीय जनता पार्टीने महापालिकेत
अमरावती : महापालिकेतील ‘गोल्डन गँग’वर जबरदस्त प्रहार करीत भारतीय जनता पार्टीने महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळविले. ८७ सदस्यीय सभागृहात भाजपाला ४५ जागा मिळाल्यात.
पालकमंत्री प्रवीण पोटे आणि आमदार सुनील देशमुख या उभय नेत्यांच्या नेतृत्वात भाजपाने ७५ ठिकाणी उमेदवार दिले. त्यापैकी ४५ उमेदवार विजयी झाल्याने त्यांचे नेतृत्व झळाळून उठले आहे. भाजपाने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटची सत्ता उलथविली आणि काँग्रेसला १५ जागांवर रोखले.
अवघ्या ७ जागांवरून भाजपाने ४५ जागांची मजल गाठली. काँग्रेसला १० जागांचा फटका बसला. जितक्या प्रभावीपणे भाजपा वाढली त्याच गतीने एमआयएम पक्षाचा प्रभावही वाढला. काँग्रेसनंतर एमआयएम हा १० जागा घेऊन तिसरा मोठा पक्ष ठरला आहे. २०१२च्या निवडणुकीत शिवसेनेचे संख्याबळ ११ होते. यंदाच्या निवडणुकीत ते अवघ्या ७ जागांवर स्थिरावले.
बहुजन समाज पक्षाने ६ जागा कायम ठेवल्या. आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षाला ३ जागा मिळाल्या. रिपाइं आठवले गटाचे प्रकाश बनसोड तब्बल पाचव्यांदा महापालिकेत पोहोचले. मागील निवडणुकीत १७ जागा मिळविणाऱ्या राकाँला भोपळाही फोडता आला नाही. तब्बल १८ वर्षांनंतर भाजपाने पूर्ण सत्ता मिळविली.