राज्य सहकारी बँकेला धक्का
By admin | Published: May 11, 2015 05:13 AM2015-05-11T05:13:24+5:302015-05-11T05:13:24+5:30
गेल्या दोन वर्षांपासून संकटातून जात असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला आणखी एक धक्का बसला आहे.
पुणे : गेल्या दोन वर्षांपासून संकटातून जात असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला आणखी एक धक्का बसला आहे. या बँकेने थकबाकीपोटी विक्रीला काढलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या संतनाथ सहकारी साखर कारखान्याचा व्यवहार सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
हा कारखाना मागील ७ ते ८ वर्षांपासून बंद होता. सुमारे ९.९० कोटी रुपयांचे कर्ज होते. त्याच्या वसुलीसाठी राज्य सरकारी बँकेने २०११मध्ये कारखाना विक्रीला काढला. कोलकाता येथील दत्त शुगर या कंपनीने ३० कोटी रुपयांना हा कारखाना विकत घेण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी कंपनीने ७५ लाख बँकेतही जमा केले. परंतु या व्यवहाराच्या विरोधात कारखान्याच्या प्रशासक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने बँकेची बाजू ग्राह्य धरत कारखाना विक्रीस परवानगी दिली होती. याविरोधात प्रशासक मंडळाने सर्वोच्च न्यायालयामार्फत या व्यवहारावर स्थगिती आणली. शिवाय बँक कमी किमतीत कारखाना विकत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायमूर्ती अनिल दवे यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णयरद्द ठरवत कारखान्याचा विक्री व्यवहार थांबवण्याचा आदेश दिला. शिवाय संचालक मंडळाने आपल्या अधिकारात नवा विक्री व्यवहार करावा, असा आदेशही न्यायालयाने नुकताच दिला आहे.
न्यायमूर्ती दवे यांनी प्रशासक मंडळास ‘तुम्ही ३० कोटींपेक्षा जास्त किंमतीत कारखाना विकू शकता काय’ असे विचारले असता प्रशासक मंडळाने तशी तयारी दर्शवली. भैरवनाथ शुगर कंपनीने ५० कोटी रुपयांना कारखाना विकत घेण्याचे मान्य केल्याचे पुरावे मंडळाने न्यायालयात सादर केले. हा प्रस्ताव सादर झाल्यानंतर न्यायमूर्तींनी बँकेच्या व्यवहारावर ताशेरे ओढताना ‘पूर्वीच्या व्यवहारात काहीतरी काळेबेरे असल्याचे दिसते,’ असे निरीक्षण नोंदविले. (प्रतिनिधी)
अशा प्रकारची पहिलीच घटना
राज्य सहकारी बँकेने आजवर २५ सहकारी कारखान्यांची विक्री केली असून, हे कारखाने खासगी क्षेत्राला विकून आपल्या कर्जाची भरपाई करून घेतली आहे. परंतु संतनाथने राज्य सहकारी बँकेच्या व्यवहारावर आक्षेप घेत तो रद्द करवून आणला.
अशा प्रकारची ही पहिलीच घटना असून, या घटनेचे राज्याच्या सहकार क्षेत्रात मोठे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला कर्ज वसुलीपेक्षा आमची संपूर्ण २८३ एकर जमीन आणि कारखाना विकण्यात जास्त रस होता. ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्याही लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेला फटकारले. आतापर्यंतच्या व्यवहारात बँकेने पारदर्शकपणे आम्हाला माहिती दिलेली नाही. कारखान्याची दीडशे एकर जमीन विकून बँकेचे थकीत कर्ज फेडण्याची आमची तयारी आहे. त्यासाठी कारखान्यावरील नेमके कर्ज, त्याचे व्याज असा अधिकृत तपशील आम्हाला द्यावा.
- शिवाजी संकपाळ, संचालक,
संतनाथ सहकारी साखर कारखाना