पुसदच्या मलिकचे हिंगोली कनेक्शन?
By admin | Published: October 22, 2015 01:27 AM2015-10-22T01:27:57+5:302015-10-22T01:27:57+5:30
गोमांस बंदीच्या निषेधार्थ गेल्या महिन्यात चाकूहल्ला करून तीन पोलीस शिपायांना जखमी करणाऱ्या पुसद येथील अब्दुल मलिकचे ‘सिमी’ व ‘अल कायदा’ या प्रतिबंधित संघटनांशी
- डिप्पी वांकाणी, मुंबई
गोमांस बंदीच्या निषेधार्थ गेल्या महिन्यात चाकूहल्ला करून तीन पोलीस शिपायांना जखमी करणाऱ्या पुसद येथील अब्दुल मलिकचे ‘सिमी’ व ‘अल कायदा’ या प्रतिबंधित संघटनांशी काही संबंध आहेत का, याचा राज्य पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) तपास करीत आहे. तसेच मलिकच्या डोक्यात भारतविरोधी कारवाया करण्याचे विष ज्याने पेरल्याचा संशय आहे त्या मौलानाविरुद्धही बळकट पुरावे गोळा केले जात आहेत. दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अन्वये मल्लिकचे निवेदन बुधवारी दंडाधिकाऱ्यांकडे नोंदवून घेण्यात आले. या निवेदनावरून मलिकचे हिंगोली व मौलाना ‘कनेक्शन’ स्पष्ट होण्यास मदत होईल, असे ‘एटीएस’ला वाटते.
मलिक याचे शोएब अहमद खान (रा. हिंगोली) याच्याशी संबंध असल्याचे आढळले होते. आॅक्टोबर २०१४ मध्ये शाह मुदस्सीर (२५) याला शोएब अहमद खान याच्यासह हैदराबाद पोलिसांनी हैदराबादेत अटक केली होती. ‘अल कायदा’ या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षण घेण्यासाठी हे दोघे हैदराबादमार्गे अफगाणिस्तानला निघाले होते.
पुसदमध्ये गोमांस बंदी निर्णयाची अमलबजावणी करणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांवर गेल्या बकरी ईदच्या दिवशी अब्दुल मलिकने मशिदीच्या बाहेर चाकूने हल्ला केला होता. एटीएसने त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध बेकायदा कारयावा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला. अब्दुल मलिकच्या मनावर अतिरेकी विचारांचा प्रभाव पाडण्यात आला होता व त्यानुसार त्याने एकट्याने हल्ले करावेत, असे सांगण्यात आले होते.
आम्ही त्याला न्यायालयात हजर केले. तेथे दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याचे म्हणणे नोंदवून घेण्यात आले. त्या निवेदनाची प्रत आम्ही न्याायालयाकडून मिळवू, असे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मौलानाने माझ्या मनावर मूलतत्ववादी विचारांचा प्रभाव कसा निर्माण केला हे अब्दुल मलिकने त्याची चौकशी करणाऱ्यांना सांगितले. भारतीय मुस्लिमांवर कसे अत्याचार होतात याची माहिती मौलाना ‘दर्स’द्वारे (धार्मिक प्रवचन) द्यायचा आणि त्याने (मौलाना) त्याला ‘कुठेतरी’ पाठविल्यास त्याचे पालक तो बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे करणार नाहीत याची तू खात्री देतोस का असेही विचारले होते. ही माहिती मलिकने चौकशीत सांगितली होती हे वृत्त सगळ््यात आधी ‘लोकमत’ने दिले होते.
‘आता तुम्ही मौलानाला अटक करणार का’, असे विचारता हा अधिकारी म्हणाला की, ‘‘मौलानाने त्याच्या निवेदनात नेमके काय म्हटले आहे हे आम्ही आधी बघू. त्याआधारे त्याने केलेल्या दाव्यांची खातरजमा करू. त्याच्या दाव्यांना बळकटी आणणारे पुरावे हाती लागल्यास अशा कारवायांमध्ये जे कोणी गुंतलेले असतील त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल.’’
दंडाधिकाऱ्यांपुढेच का?
आरोपी पोलिसांच्या ताब्यात असतो तेव्हा त्याने त्यांना काय सांगितले हे खटल्याच्या सुनावणीत मान्य होत नाही. तथापि, दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आरोपीने केलेले निवेदन मान्य होते व खटल्यामध्ये ते पुरावा बनते.
शाह मुदस्सीर हा कला शाखेचा पदवीधर असून उमरखेडमध्ये त्याचे जनरल स्टोर होते. अल कायदाच्या कारवायांची भारतात अमलबजावणी करणाऱ्या ‘सिमी’शी (स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट आॅफ इंडिया) अब्दुल मलिक आणि शोएब अहमद खान संबंधित होते. ‘अल कायदा’च्या गुप्त शाखेचा भाग म्हणून स्थानिक युवकांचा संपूर्ण गट काम करीत आहे का याचा एटीएस सध्या शोध घेत आहे.