पुसदच्या नेत्रतज्ज्ञाला चार लाखांचा दंड
By admin | Published: June 4, 2016 03:18 AM2016-06-04T03:18:08+5:302016-06-04T03:18:08+5:30
शस्त्रक्रियेतील निष्काळजीपणामुळे रुग्णाला कायमचे अंधत्व आले. याप्रकरणी पुसद येथील नेत्रतज्ज्ञाला चार लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
यवतमाळ : शस्त्रक्रियेतील निष्काळजीपणामुळे रुग्णाला कायमचे अंधत्व आले. याप्रकरणी पुसद येथील नेत्रतज्ज्ञाला चार लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. यवतमाळ ग्राहक न्यायालयाने दिलेला हा निर्णय राज्य ग्राहक आयोगाने कायम ठेवला आहे.
पुसद येथील देवीकर हॉस्पिटलचे डॉ. अनिल देवीकर असे दंड झालेल्या नेत्रतज्ज्ञाचे नाव आहे. महागाव येथील भगवानराव शामराव पहुरकर यांनी डॉ. देवीकर यांच्याकडे डोळ््यावर उपचार सुरू केले. त्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला. यासाठी आवश्यक त्या तपासण्या करून ५ मे २०१० रोजी पहुरकर यांच्या डोळ््यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्यांच्या डोळ््यात वेदना सुरू झाल्या. दोन महिन्यानंतर शस्त्रक्रिया झालेला डोळा निकामी झाला. डोळा काढून टाकण्यात आल्याने पहुरकर यांना एका डोळ््याने कायमचे अंधत्व आले. सदोष आणि निष्काळजीपणे दिलेल्या सेवेमुळेच त्यांचा डोळा गेला, या निर्णयाप्रत यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालय आले.
ग्राहक न्यायालयाने २४ सप्टेंबर २०१३ रोजी पहुरकर यांच्या बाजूने निर्णय दिला. नुकसान भरपाईपोटी तीन लाख ५० हजार रुपये, मानसिक व शारीरिक त्रासापोटी ५० हजार, शस्त्रक्रियेनंतर करावा लागलेला प्रवास, औषधोपचार आदी खर्चापोटी १० हजार आणि तक्रार अर्जाच्या खर्चापोटी दोन हजार रुपये द्यावे असा आदेश मंचाने डॉ. अनिल देवीकर यांना दिला. या निर्णयाविरोधात डॉ. देवीकर यांनी राज्य ग्राहक आयोगाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. (वार्ताहर)