प्राध्यापिकेला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटविले; महाराष्ट्र हळहळला, सर्वत्र संतापाची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 02:34 AM2020-02-04T02:34:38+5:302020-02-04T06:16:44+5:30

महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या शांतताप्रिय जिल्ह्याला सोमवारी हिंगणघाट येथील क्रूर घटनेने गालबोट लागले.

Putting petrol on fire at the professor's body; Feeling of anger throughout Maharashtra | प्राध्यापिकेला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटविले; महाराष्ट्र हळहळला, सर्वत्र संतापाची भावना

प्राध्यापिकेला भररस्त्यात पेट्रोल टाकून पेटविले; महाराष्ट्र हळहळला, सर्वत्र संतापाची भावना

Next

हिंगणघाट (वर्धा)/ नागपूर : महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या शांतताप्रिय जिल्ह्याला सोमवारी हिंगणघाट येथील क्रूर घटनेने गालबोट लागले. महाविद्यालयात निघालेल्या २४ वर्षीय प्राध्यापक तरुणीला भर रस्त्यावर लोकांच्या समोरच पेट्रोल टाकून पेटवण्यात आले. प्राध्यापिका ४० टक्के जळाल्याने तिला नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, आरोपीला नागपूर जिल्ह्यातून अटक केली आहे.

ही प्राध्यापिका सकाळी बसमधून हिंगणघाटच्या नंदोरी चौकात उतरली. तेथून महाविद्यालयात जात असताना तिच्या मागावर असलेला युवक मित्रासोबत दुचाकीने तिथे आला. दुचाकी थांबवून त्यातील पेट्रोल प्लास्टिकच्या बाटलीत काढले. त्याच्या हातात कापड गुंडाळलेला टेंभाही होता. काही कळायच्या आत प्राध्यापिकेच्या अंगावर पेट्रोल ओतून हातातील टेंभ्याने पेटवून दिले. क्षणार्धात तिने पेट घेतल्याने दोन्ही युवकांनी पळ काढला. आगीत होरपळणाऱ्या प्राध्यापिकेची आरडाओरड पाहून विद्यार्थिनी व युवकांनी धाव घेत तिला विझविले.

तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पोलिसांनी नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, पेट्रोल श्वसननलिकेपासून ते अन्ननलिकेपर्यंत गेले असावे. यामुळे शरीरावरील व आतील जखमा गंभीर आहेत. पुढील ७२ तास महत्त्वाचे आहेत. तिला अतिदक्षता विभागात ठेवले आहे. तिचा चेहरा, मान, डोक्याचा भाग, डावा हात, छातीचा भाग जळाला आहे. तिला श्वास घेण्यास कठीण जात आहे.

दोन युवक दुचाकीने पळून गेल्याची माहिती एका विद्यार्थिनीने पोलिसांना दिली. त्यानंतर सकाळी १०.३० च्या सुमारास विकेश ऊर्फ विक्की ज्ञानेश्वर नगराळे, (रा. दरोडा, ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा) याला अटक केली. नंतर हिंगणघाट पोलिसांच्या स्वाधीन केले. विकेश विवाहित असून, त्याने तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न का केला, हे मात्र कळू शकले नाही. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमेश तुळसकर यांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

विद्यार्थिनींचा आक्रोश

या पेट्रोल हल्ल्याची माहिती महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना मिळताच त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडक दिली. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांना गराडा घालून दोषी युवकावर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी विद्यार्थिनींचे अश्रू अनावर झाले होते.

फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी

या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात करण्यात येईल. बलात्कारासंदर्भात आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायदा करण्यासाठी आपण तेथील गृहमंत्र्यांना भेटणार आहोत असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Putting petrol on fire at the professor's body; Feeling of anger throughout Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.