गगनयानाच्या बूस्टरची गुणवत्ता वालचंदनगरमध्ये होणार सिद्ध, देशातील पहिलीच यंत्रणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 06:22 AM2020-12-12T06:22:11+5:302020-12-12T06:23:51+5:30

Gaganyan : गगनयान हा भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गगनयानाच्या उड्डाणासाठी लागणारे बूस्टर पुण्यातील वालचंदनगर कंपनीत तयार होणार आहे.

The quality of Gaganyana's booster will be proved in Walchandnagar | गगनयानाच्या बूस्टरची गुणवत्ता वालचंदनगरमध्ये होणार सिद्ध, देशातील पहिलीच यंत्रणा

गगनयानाच्या बूस्टरची गुणवत्ता वालचंदनगरमध्ये होणार सिद्ध, देशातील पहिलीच यंत्रणा

Next

- निनाद देशमुख
 
पुणे : गगनयान हा भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गगनयानाच्या उड्डाणासाठी लागणारे बूस्टर पुण्यातील वालचंदनगर कंपनीत तयार होणार आहे. बूस्टर उभारणीबरोबरच आता बूस्टरच्या गुणवत्ता चाचणीचाही प्रकल्प कंपनीने उभारल्याने अंतिम प्रक्षेपणापूर्वीच्या सर्व चाचण्या या कंपनीतच करता येणार आहेत. केवळ दीड वर्षात हा प्रकल्प कंपनीने उभारला असून, अशी क्षमता असणारी वालचंदनगर कंपनी ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे.

गगनयान ही भारताची पहिली मानवरहित अंतराळ मोहीम आहे. २०२० मध्ये ही मोहीम राबविली जाणार होती. मात्र, कोरोनामुळे गगनयानाचे प्रक्षेपण लांबले. असे असले तरी या मोहिमेचे सर्व प्रकल्प पुन्हा सुरू केले आहेत. मुख्य यानाबरोबर हे यान अंतराळात पाठविण्यासाठी जीएसएलव्ही मार्क ३ या भारताच्या बाहुबली प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. बूस्टर बनविण्याबरोबरच बूस्टरची क्षमता तपासण्याचा प्रकल्पही कंपनीत उभारला आहे. विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटरचे निदेशक एस. सोमनाथ तसेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने या प्रकल्पाचे उद्घाटन १८ डिसेंबरला कंपनीच्या आवारात होणार आहे.

क्र्यू एस्केप सिस्टिमही करणार तयार
गगनयान मोहिमेच्या प्रक्षेपणादरम्यान एखादा अपघात झाल्यास अंतराळवीरांचा जीव वाचविण्यासाठी क्र्यू एस्केप सिस्टिमही कंपनीत तयार करण्यात येत आहे. यानाचा स्फोट झाल्यास आपोआप या यंत्रणेमुळे यानाचा अंतराळवीर असलेला भाग हा यानापासून दूर होईल. हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर असून त्याचे कामही लवकरच पूर्ण होणार आहे. 

चांद्रयान मोहिमेतही महत्त्वाची भूमिका आम्ही पार पाडली होती. बूस्टर गुणवत्ता चाचणी प्रकल्पाबाबत इस्रोने मागणी केली होती. त्यानुसार केवळ दीड वर्षात आम्ही हा प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पामुळे वेळेत बूस्टरची गुणवत्ता तपासता येणार आहे. यामुळे अंतराळ मोहिमेतील अपघात टाळता येणार आहे.
    - चिराग दोषी, 
    व्यवस्थापकीय संचालक,     वालचंदनगर इंडस्ट्रीज 

 

Web Title: The quality of Gaganyana's booster will be proved in Walchandnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :isroइस्रो