युरोप, मध्य-पूर्व देशांतील प्रवाशांना क्वारंटाइन बंधनकारक; राज्यात रात्रीची संचारबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 06:06 AM2020-12-22T06:06:01+5:302020-12-22T06:06:27+5:30
Night curfew in the state : कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून, पुढील १५ दिवस अधिक सतर्क राहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई : राज्यात मंगळवारपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ५ जानेवारीपर्यंत हा निर्णय लागू राहील. संपूर्ण युरोप व मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचा, तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला आहे.
कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून, पुढील १५ दिवस अधिक सतर्क राहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. लवकरच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेण्यात येणार आहे. राज्यात विवाह सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
२४ तासांत निर्णय बदलला!
राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी म्हटले होते. मात्र, ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी म्हणून रात्रीच्या संचारबंदीची घोषणा सोमवारी करण्यात आली. या निर्णयामुळे ३१ डिसेंबर साजरा करणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले असून, नाताळ सणही घरीच साजरा करावा लागणार आहे.
नवे निर्बंध असे...
- संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन बंधनकारक.
- क्वारंटाइन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल.
- ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात, तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाइन करण्यास हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाचीही व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
- अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाइन केले जाईल.
- युरोपीय, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देणार.
- युरोप आणि मध्य-पूर्व देशातून प्रवास केलेल्यांनी देशांतर्गत विमान प्रवास केला असेल, तर त्यांची माहिती त्यांनी देणे गरजेचे असेल.