माथेरानच्या राणीचा ‘साज’ उतरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2016 04:44 AM2016-12-26T04:44:13+5:302016-12-26T04:44:13+5:30

माथेरानची राणी अशी ओळख आणि पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेली मिनी ट्रेन सध्या गर्दुल्ले आणि दारुड्यांचा अड्डा बनत चाललेली आहे.

The Queen of Matheran got 'Saaz' | माथेरानच्या राणीचा ‘साज’ उतरला

माथेरानच्या राणीचा ‘साज’ उतरला

Next

मुंबई : माथेरानची राणी अशी ओळख आणि पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेली मिनी ट्रेन सध्या गर्दुल्ले आणि दारुड्यांचा अड्डा बनत चाललेली आहे. मे २0१६पासून मिनी ट्रेन बंद असल्याने, या ट्रेनचे डबे नेरळमधील स्थानकातच उभे करण्यात आले. मात्र, मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्षामुळे, माथेरानची राणी म्हणून ओळख असलेल्या या ट्रेनचे सौंदर्य झाकोळले आहे. या दुर्लक्षामुळेच सध्या मिनी ट्रेनच्या डब्यात दारूच्या बाटल्या, सिगारेटचा खच पडलेला पाहून, गेल्या अनेक महिन्यांपासून त्याच्या देखभालीकडे लक्षच दिले नसल्याचे दिसते.
माथेरानची मिनी ट्रेन रुळावरून घसरण्याच्या सलग दोन घटना २0१६मधील एप्रिल महिन्याच्या अखेरीस आणि मे महिन्याच्या सुरुवातीला घडल्या. या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. यानंतर, रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार सुरक्षा उपाय योजण्यासाठी चार सदस्यांच्या एक स्वतंत्र समितीचीही स्थापना करण्यात आली. या समितीकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. अहवालातून मिनी ट्रेनमध्ये सुधारणा करण्याबरोबरच प्रवाशांसाठी सुरक्षेचे उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. समितीने सादर केलेल्या अहवालात एअर ब्रेक बसवितानाच घाट सेक्शनमध्ये ६५0 मीटरची भिंतही बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आणि तो मंजुरीही झाला. त्यानंतर, सुरक्षा उपाययोजना करून माथेरान मिनी ट्रेन सुरू केली जाईल, असे वारंवार आश्वासन मध्य रेल्वेकडून देण्यात आले. तरीही अजूनही जैसे थेच परिस्थिती आहे.
मिनी ट्रेन सुरू न झाल्याने, या ट्रेनचे काही डबे नेरळ स्थानकातच उभे करण्यात आले. मात्र, डबे उभे केल्यानंतर त्याकडे गेले अनेक महिने रेल्वे अधिकारी फिरकलेच नसल्याचे दिसून आले. सध्या मिनी ट्रेनच्या डब्यांची दुरवस्था झाली असून, डब्यांचे दरवाजे तुटले आहेत. डब्यांमध्ये अक्षरश: दुर्गंधीचे साम्राज्य आहे. दारूच्या बाटल्या आणि सिगारेटचा अक्षरश: खच पडलेला, तर पान खाऊन ठिकठिकाणी थुंकण्यात आलेले आहे, तसेच हे डबे गर्दुल्ले, दारुडे यांचा निवाराच बनल्याचे दिसते. एकंदरीतच मिनी ट्रेनच्या डब्यांची दुरवस्था पाहून पर्यटकांना एकच प्रश्न पडतो की, या पुढे ट्रेन धावणार की नाही? (प्रतिनिधी)

Web Title: The Queen of Matheran got 'Saaz'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.