क्वीन्स नेकलेस अखेर लखलखणार !
By Admin | Published: August 13, 2015 03:01 AM2015-08-13T03:01:23+5:302015-08-13T03:01:23+5:30
महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मरिन ड्राइव्हवर लवकरात लवकर पिवळे एलईडी दिवे लावण्याचे निर्देश एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिस लिमिटेड कंपनीला दिले आहेत.
मुंबई : महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मरिन ड्राइव्हवर लवकरात लवकर पिवळे एलईडी दिवे लावण्याचे निर्देश एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिस लिमिटेड कंपनीला दिले आहेत. त्यामुळे रया गेलेला मुंबापुरीचा क्वीन नेकलेस आता पुन्हा एकदा पिवळ्या दिव्यांनी लखलखणार आहे. मुंबईची गेलेली शोभा परतणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मरिन ड्राइव्हच्या रस्त्यांवर पुन्हा जुनेच पिवळे दिवे लावण्याचे आदेश शुक्रवारी राज्य शासनाला दिले होते. यावर एनर्जी एफिशन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने न्यायालयात पिवळे एलईडी दिवे लावण्यासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.
या पुनर्विचार याचिकेवर न्यायालयाने मरिन ड्राइव्हवर पिवळे एलईडी दिवे लावण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका आयुक्तांनीही एनर्जी एफिशिअन्सी सर्व्हिस लिमिटेडला मरिन ड्राइव्हवर पिवळे एलईडी दिवे लावण्याच्या सूचना केल्या आहेत.
(प्रतिनिधी)
एलईडी वापरल्यास १० कोटी युनिट वीज वाचेल : एलईडी दिवे बसविण्याहून महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये रंगलेला वाद चव्हाट्यावर आला होता. शिवसेनेने क्वीन नेकलेसवरील दिवे बदलण्यास विरोध दर्शविला असतानाच ही योजना पर्यावरणपूरक, ऊर्जा बचत करणारी आणि महापालिकेचा पैसा वाचविणारी असल्याचा सूर भाजपाने लावला होता. रस्त्यांवर एलईडी दिव्यांचा वापर सुरू केल्यानंतर १० कोटी युनिट वीज वाचेल, असा दावा भाजपाने केला होता. भाजपप्रणीत योजनेला शिवसेनेने विरोध दर्शविल्याने त्याचे राजकारणात पडसाद उमटले होते.