दरडीवरील झोपड्यांचा प्रश्न सुटेना
By admin | Published: May 1, 2017 07:07 AM2017-05-01T07:07:37+5:302017-05-01T07:07:37+5:30
मुंबई शहर आणि उपनगरातील धोकादायक दरडींचा प्रश्न चिघळत आहे. पावसाळ्यास एक महिना शिल्लक राहिला असला
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील धोकादायक दरडींचा प्रश्न चिघळत आहे. पावसाळ्यास एक महिना शिल्लक राहिला असला, तरी याकडे महापालिकेसह उर्वरित प्राधिकरणांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
दरडीलगतच्या झोपड्यांच्या सुरक्षेबाबत महापालिकेसह जिल्हाधिकारी कार्यालय उचित कार्यवाही करत नसल्याने, हा प्रश्न दर पावसाळ्यात समोर येत आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील ३२७ ठिकाणांवरील २२ हजार ४८३ झोपड्यांना दरडीचा धोका आहे. सुमारे १.१५ लाख रहिवासी येथे राहात आहेत. सरकारने सुरक्षेची उपाययोजना म्हणून दरडीलगत संरक्षण भिंत बांधण्यास सुरुवात केली. मात्र, हे कामदेखील व्यवस्थित होत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
एम/पूर्व विभागातील दिनक्वारी मार्ग येथील गौतमनगर, पांजरापोळ, तसेच वाशीनाका येथील ओम गणेशनगर, राहुलनगर, नागाबाबा नगर, सह्याद्रीनगर, अशोकनगर, भारतनगर, बंजारतांडा, हशू अडवाणी नगर व एल. यू. गडकरी मार्ग येथील विष्णूनगर या ठिकाणच्या टेकडीच्या/डोंगराच्या उतारावर वसलेल्या झोपडपट्टीवासीयांना महापालिका प्रशासनातर्फे धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
येत्या पावसाळ्यात जोरदार पावसाने दरडी कोसळण्याची तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्यामुळे स्थानिक रहिवाश्यांनी स्वत:हून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.""
स्थलांतर न करता, तेथेच राहणाऱ्या रहिवाशांनी स्वत:च्या जबाबदारीवर राहावे, नैसर्गिक आपत्तीने कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवित अथवा वित्तहानी झाल्यास महापालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
१९९२ सालापासून या कामी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, संरक्षक भिंत हा कायमचा उपाय नाही, तर सरकारने धोकादायक असलेल्या झोपड्यांचे पुनर्वसन एमएमआरडीए आणि पालिकेच्या ताब्यात असलेल्या प्रकल्प बाधितांसाठी राखीव असलेल्या घरांमध्ये करणे गरजेचे आहे.
मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडाचे मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे दरडीलगतचे रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
झोपड्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर आणि संरक्षक भिंती बांधल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती कोणी करायची, असे अनेक प्रश्न निरुत्तरित असल्याने हा गुंता सुटण्याऐवजी वाढतच आहे.
१९९२ ते २०१३ या काळात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांत २६० जणांचा मृत्यू झाला, तर २७० जण जखमी झाले.
२४ तासांत सरासरी २०० मिलीमीटर पाऊस पडला, तर साधारणत: दरड कोसळण्याच्या घटना घडतात.
खडकातली पाणी शोषण्याची क्षमता संपली की, त्यात भेगा पडतात. परिणामी, पाणी बाहेर पडून दगडाचा काहीसा भाग सुटतो आणि ढासळू लागतो.
दरड कोसळणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे ती रोखता येणार नाही. मात्र, त्यासाठी पुरेशी काळजी घेणे शक्य आहे.
२०० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर, संबंधित ठिकाणी सुरक्षेचा इशारा दिला, तर दुर्घटनांमधील जीवितहानी टाळता येईल.