तूरखरेदीसाठी शेतकऱ्यांना विचारली जातेय जात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 05:09 AM2020-02-27T05:09:27+5:302020-02-27T06:58:00+5:30
शेतकऱ्यांतून संताप व्यक्त
हिंगोली : यंदा दोन वर्षांनंतर पुन्हा शेतकऱ्यांनी नाफेडच्या केंद्रावर गर्दी केली आहे. बाजारात असलेला भाव व नाफेडचा हमीभाव यातील तफावतीचा हा परिणाम आहे. मात्र, या ठिकाणीही माल विकायचा झाला, तर चक्क जात विचारली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.
वसमत, कळमनुरी, हिंगोली, जवळा बाजार, जवळा, पानकनेरगाव, साखरा या ठिकाणच्या केंद्रांवर तूरखरेदी करण्याआधी नोंदणी करताना शेतकऱ्यांना जात किंवा प्रवर्ग विचारला जात आहे. ही माहिती भरल्याशिवाय संगणकावरील प्रक्रियाच पूर्ण होत नाही. या रकान्यात ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती, सर्वसाधारण प्रवर्ग आणि इतर हे उल्लेख आहेत. त्यामुळे शेतकरी गोंधळून जात आहे. प्रवर्ग कोणताही असला, तरीही त्या शेतकºयांना भाव कमी अथवा जास्त मिळणार नाही. मग हा उपद्व्याप कशासाठी? असा सवाल केला जात आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी सेनगाव तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात आम्हाला वेगवेगळी पिके घेणे माहीत आहे. आमची जात विचारून भावना दुखावत आहेत. त्यामुळे पणन महासंचालकांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली आहे.