पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 02:08 PM2024-09-24T14:08:21+5:302024-09-24T14:11:05+5:30

काल एन्काउंटर झाल्यावर लगेच एक पोस्टर व्हायरल झालं, न्याय असाच हवा, पोलिसाची टोपी आणि खाली धर्मवीर २ लिहिलं होते असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं. 

Question mark on police action in Akshay Shinde Encounter, Uddhav Thackeray party leader Sushma Andhare allegation on Govenment, will go to court in Akshay Shinde encounter case | पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार

पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार

पुणे - बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी. या प्रकरणातील पोलिसांचे निलंबन व्हावे अशी मागणी करत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी कोर्टात जाणार असल्याचं सांगितले आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी या एन्काउंटर प्रकरणी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, मुलींना न्याय मिळाला पाहिजे पण बदलापूर आरोपी एन्काउंटर प्रकरणी तुम्ही शाळा प्रशासनाला सोडून दिले त्याचे काय?, मी आई आहे, विरोधक म्हणून बोलत नाही. शिक्षिका म्हणून आणि कायद्याची विद्यार्थिनी म्हणून बोलतेय. या सगळ्या प्रकरणात जिथं सीसीटीव्ही नव्हते ती शाळा तुम्ही का वाचवताय? शाळा वाचवणे तुम्हाला कितपत योग्य वाटतंय? एन्काउंटर केलेल्या पोलिसांचे निलंबन व्हायला हवे. जेव्हा अक्षय शिंदेकडून गोळी झाडली जाते तेव्हा ती पायावर झाडली जाते मात्र जेव्हा पोलीस गोळी झाडतात तेव्हा ती थेट डोक्यात लागते हे आकलनाच्या पलीकडे आहे. या प्रकरणाची न्यायाधीशांच्या समितीकडून उच्चस्तरीय चौकशी व्हायला हवी. या प्रकरणाला राज्य सरकारच्या प्रभावापासून लांब ठेवले जावे असं त्यांनी मागणी केली. 

तसेच संजय शिंदे या पोलीस अधिकाऱ्याने ठाण्याच्या हद्दीत अनेक दिवस ड्युटी केली आहे. ठाण्यातून जे सत्ताकेंद्र चालते त्यावर आमचा अजिबात विश्वास नाही. त्यामुळे आम्ही आमच्या मागण्या स्पष्ट ठेवल्या आहेत. जर अशाप्रकारे एन्काउंटर झाले तर २४ तासांच्या आत याची सगळी माहिती मानवाधिकार कमिटीला गेली पाहिजे. ही माहिती त्यांना मिळाली आहे का? यावरही चर्चा व्हायला हवी. या सगळ्या प्रकरणी अद्याप आपटेची अटक का नाही, शाळा प्रशासनाचं काय करणार आहात यावर आम्ही रितसर कोर्टात प्रश्न विचारणार आहोत. कोर्टात आम्ही आमची भूमिका कागदोपत्री मांडणार आहोत असं सुषमा अंधारे यांनी सांगितले. 

दरम्यान, पोलीस व्यवस्थेचा आदर आणि धाक राहिला पाहिजे. पोलिसांवरील विश्वास संपता कामा नये. बलात्कार प्रकरणात तुम्हाला एक माणूस सापडतो, तुम्ही त्या माणसाचा एन्काउंटर केला, लोक वाह वाह म्हणतील कारण बलात्काऱ्याबद्दल लोकांच्या मनात तिरस्काराची भावना असते त्यामुळे त्याचा एन्काऊंटर झालेला कुणालाही आवडेल. मात्र बलात्कार प्रकरणातील एका आरोपीचा जेव्हा एन्काउंटर केला जातो तेव्हा तो एकटा नसतो त्याचं कितीतरी मोठं रॅकेट असेल. ते रॅकेट कसं बाहेर निघणार, त्यासाठी प्रयत्न केले जाणार की नाही हे प्रयत्न होणे गरजेचे आहे असंही अंधारे यांनी म्हटलं. 

उज्ज्वल निकमांवर प्रहार

उज्ज्वल निकमसारख्या भाजपा प्रवक्त्याला या प्रकरणी बोलायची किती घाई झाली होती. घाईघाईत त्यांनी प्रतिक्रिया दिली, कधी कधी आरोपीला वाटतं आपण मरण निश्चित आहे तेव्हा तो मानसिक दबावाखाली येतो आणि स्वत:वर गोळी झाडून घेतो अशाच प्रकारे अक्षय शिंदेने गोळी झाडून घेतली. काय तत्परता आहे भाजपाची? ज्या माणसाचा एन्काउंटर झालाय त्याला सुसाईड ठरवण्यासाठी जो माणूस हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात केसेस लढवतो, जो स्वत:ला वकील म्हणवतो, तो भाजपात गेल्यानंतर त्याचा सदसदविवेकबुद्धी गहाण पडतो याचे फार मोठे उदाहरण म्हणजे एन्काउंटर झालेल्या व्यक्तीला सुसाईड ठरवण्यासाठी उज्ज्वल निकम घाईघाईने पुढे येतात अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. 

...मग पोलीस, कोर्ट कशाला आहेत?

नैसर्गिक न्याय झाला असं खासदार नरेश म्हस्के म्हणतात, त्यांचे हे विधान अतिशय गंभीर आहे. उद्या कुणीही कुणाचा एन्काउंटर करेल, माझ्या दृष्टीने जे गुन्हेगार आहेत त्याला गोळी घातली आणि संपला विषय हा नैसर्गिक न्याय असू शकत नाही. एखाद्या गोष्टी ठरण्यासाठी त्याला सुनावणी, युक्तिवाद, न्याय, पुरावे या अनेक गोष्टी आहेत. ही सगळी प्रक्रिया तुम्ही डावलणार असाल तर त्याला पोलीस प्रशासन कशाला अस्तित्वात आहे? मग न्यायालये कशाला आहेत, मग फक्त ५-१० एन्काउंटर स्पेशालिस्ट ठेवा बाकीच्या गोष्टीच करू नका अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी म्हस्के यांच्या प्रश्नावर दिली. 

चित्रपटाच्या लॉन्चिंगसाठी हे केले का? 

अक्षय शिंदे हा समाजसुधारक नाही, त्याला फाशीच व्हायला हवी पण ती फाशी होताना लोकांच्या मनात कायद्याचा धाक आणि आदर शाबूत राहिला पाहिजे तो अशा प्रकरणानं राहत नाही. त्यामुळे ही गंभीर समस्या आहे. या प्रकरणातून कोणाला वाचवायचं आहे? काल एन्काउंटर झाल्यावर लगेच एक पोस्टर व्हायरल झालं, न्याय असाच हवा, पोलिसाची टोपी आणि खाली धर्मवीर २ लिहिलं होते. चित्रपटाच्या लॉन्चिंगसाठी हे केले का? असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला. 
 

Web Title: Question mark on police action in Akshay Shinde Encounter, Uddhav Thackeray party leader Sushma Andhare allegation on Govenment, will go to court in Akshay Shinde encounter case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.