एटीएसच्या तपासावर प्रश्नचिन्ह
By admin | Published: January 13, 2017 04:41 AM2017-01-13T04:41:29+5:302017-01-13T04:41:29+5:30
मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) योग्य व प्रमाणिकपणे तपास केला नाही
मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) योग्य व प्रमाणिकपणे तपास केला नाही, असा आरोप साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्या वकिलांनी उच्च न्यायालयात युक्तिवादादरम्यान केला.
विशेष न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर साध्वीने उच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान दिले. न्या. रणजित मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. राष्ट्रीय तपास पथकाने साध्वीला क्लीन चिट देऊनही विशेष एनआयएन न्यायालयाने तिचा जामीन अर्ज मंजूर करण्यास नकार दिला. विशेष न्यायालयाने एटीएस व एनआयएने दाखल केलेले दोषारोपपत्र ग्राह्य धरले आहे. मात्र खटला चालवताना एकच दोषारोपपत्र ग्राह्य धरावे लागले. एटीएस की एनआयएचे दोषारोपपत्र ग्राह्य धरायचे, याबाबत न्यायालयाला निर्णय घ्यावा लागेल, असाही युक्तिवाद तिचे वकील अविनाश गुप्ता यांनी केला. (प्रतिनिधी)