EVM वर विरोधकांकडून शंका; निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे दाखवलेले 'हे' आकडे बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 17:18 IST2024-12-10T17:18:02+5:302024-12-10T17:18:38+5:30

मतमोजणीनंतर ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यामध्ये कुठेही तफावत आढळून आलेली नाही, असं आयोगाने म्हटलं आहे.

Question marks on EVMs Important information about Maharashtra Vidhan Sabha elections from the Election Commission | EVM वर विरोधकांकडून शंका; निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे दाखवलेले 'हे' आकडे बघा!

EVM वर विरोधकांकडून शंका; निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे दाखवलेले 'हे' आकडे बघा!

Election Commission ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांकडून ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. महायुतीला मिळालेलं यश हे जनादेश नसून ईव्हीएमची कमाल असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज एक पत्रक काढत महत्त्वाची माहिती दिली आहे. "महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतमोजणीत सर्व २८८मतदारसंघांमध्ये एकूण १४४० व्हीव्हीपॅटमधील स्लीप्सची अनिवार्य मोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्ण झाली असून ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यात कोणतीही तफावत आढळली नाही," असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने माहिती देताना म्हटलं आहे की, "केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतदानकेंद्रांच्या क्रमांकामधून लॉटरी पद्धतीने निवडलेल्या ५ मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट मशिन्सच्या स्लीप्सची मोजणी बंधनकारक आहे. या प्रक्रियेला उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. ईव्हीएममधील प्रत्येक उमेदवाराच्या मतसंख्येशी व्हीव्हीपॅट स्लीप्सची संख्या पडताळणे हा या प्रक्रियेचा उद्देश आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळेस सर्व २८८ मतदारसंघांमध्ये एकूण १४४० व्हीव्हीपॅटमधल्या स्लीप्सची अनिवार्य मोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी पूर्ण करण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी सर्व मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ५ मतदान केंद्रांच्या क्रमांकाची सरमिसळ करून भारत निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांच्या समोर आणि उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतदान केंद्रे निवडण्यात आली. या प्रक्रियेनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधील ५ मतदान केंद्रांतील मतमोजणीनंतर ईव्हीएममधील मतांची उमेदवारनिहाय संख्या आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील उमेदवारनिहाय स्लीप्सची संख्या यामध्ये कुठेही तफावत आढळून आलेली नाही, असे अहवाल महाराष्ट्र राज्यातील सर्व म्हणजे ३६ जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाले आहेत," असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

"संपूर्ण प्रक्रियेचे सीसीटिव्ही कव्हरेज तसेच चित्रिकरण"

"ही प्रक्रिया प्रत्येक मतमोजणी केंद्रात उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोरच पार पडलेली असल्याने, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या दस्तऐवजांवरही या प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत. व्हीव्हीपॅट स्लीप्सच्या मोजणीच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी, प्रत्येक मतमोजणी केंद्रावर विशेष सुरक्षेची काळजी घेऊन स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलेला होता, आणि या संपूर्ण प्रक्रियेचे सीसीटिव्ही कव्हरेज तसेच चित्रिकरण करण्यात येऊन ते जतन केले गेले आहे. मतमोजणीच्या संदर्भातील भारत निवडणूक आयोगाच्या विहित प्रक्रियेनुसार प्रत्येक मतदारसंघाच्या ५ मतदान केंद्रांसाठीची व्हीव्हीपॅट स्लीपची गणना अनिवार्य असून, ती पूर्ण झाल्याशिवाय मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होत नाही, तसेच विजयी उमेदवार जाहीर करता येत नाही. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांमध्ये याबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले आहे," अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

Web Title: Question marks on EVMs Important information about Maharashtra Vidhan Sabha elections from the Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.