वेसावे खाडीपुलाचा प्रश्न सुटणार

By admin | Published: April 7, 2017 02:06 AM2017-04-07T02:06:01+5:302017-04-07T02:06:01+5:30

वेसावे-मढ खाडीवर पूल उभारण्यासाठी वेसाव्याच्या शिवकर समाज आणि मढ ग्रामस्थांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

The question of Vesay Khadi will be solved | वेसावे खाडीपुलाचा प्रश्न सुटणार

वेसावे खाडीपुलाचा प्रश्न सुटणार

Next

मनोहर कुंभेजकर,
मुंबई- गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या वेसावे-मढ खाडीवर पूल उभारण्यासाठी वेसाव्याच्या शिवकर समाज आणि मढ ग्रामस्थांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. या खाडीवर पूल उभारल्यास मढवासीयांचा १४ कि.मी.चा फेरा वाचणार आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसायाला गती मिळणार असून, इंधनाची आणि वेळेची मोठी बचत होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मढवासीयांना शैक्षणिक आणि आरोग्य सुविधाही जवळ येणार आहे.
सध्या या मार्गावर दर १० मिनिटांच्या अंतराने सकाळी ५ ते मध्यरात्री १.३० वाजेपर्यंत फेरीबोट सेवा सुरू आहे. सुमारे ५ ते ६ हजार नागरिक त्यातून प्रवास करतात. मढ-वेसावे खाडीवर पूल नसल्यामुळे मढवासीयांना मालाड पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी १४ कि.मी.चा लांबचा पल्ला पडतो. मढवासीयांचा प्रामुख्याने मासेमारी व्यवसाय असल्यामुळे मासेमारीसाठी लागणाऱ्या बर्फासह मासे विक्रीसाठी लांबच्या पल्ल्यामुळे इंधन आणि वेळेचाही अपव्यय होतो. मढवासीयांना शाळा, महाविद्यालय, सरकारी रुग्णालय सर्वच लांब असल्याने त्यांना १४ किमीपर्यंत शिक्षणासाठी आणि आरोग्यसेवेसाठी मालाडला जावे लागते. त्यामुळे या मार्गावर पूल उभारणे गरजेचे असल्याची माहिती महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे मुंबई अध्यक्ष किरण कोळी यांनी दिली. नागरिकांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नगरसेविका संगीता सुतार आणि मढच्या कार्यकर्त्यांसह मढ-वेसावा खाडीपुलाला विरोध करणारे वेसावा येथील शिवकर कोळी समाजाचे अध्यक्ष प्रवीण भानजी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक बुधवारी पार पडली. या वेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे किरण कोळी यांनी सांगितले. विकासाला विरोध नाही, मात्र पुलाचा रस्ता समाजाची बोटी शाकारण्याची जागा असलेल्या शिवकर समाजाच्या मालकीच्या जागेतून जात असल्याचे भानजी यांनी सांगितले. त्यामुळे मालकी हक्काच्या जागेवर गदा न आणता प्रस्तावित रस्ता सरकारी जागेत हलवावा, अशी मागणी त्यांनी केली.
पालिकेच्या मुख्य अभियंत्यांनी पुलाच्या जागेची पाहणी केली होती. त्या वेळी कोणाचेही नुकसान न होता पूल उभारावा अशी मागणी स्थानिकांनी केली होती. या पुलाच्या उभारणीसाठी पालिका आणि मंत्रालय स्तरावर चर्चा सुरू असून, पुलाची जागा बदलली असून, सर्व्हे झाल्याशिवाय जागेत बदल झाला की नाही हे माहीत होणार नाही, अशी भूमिका अनिल भोपी यांनी मांडली.
>शिवकर समाजाने सहकार्य करावे!
शिवकर समाजाची बोटी शाकारण्याची जागा आणि मासेमारी व्यवसाय यांना धोका होता कामा नये, याची काळजी घेतली जाईल. प्रकल्पाच्या उत्तरेला जागा हलवल्यास सीआरझेडची परवानगी घ्यावी लागणार आहे.
तर पुलाखालची जागा मत्स्यव्यवयासाठी शिवकर समाजाला मिळण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्याकडे पाठपुरावा करू, अशी भूमिका किरण कोळी यांनी घेतली. त्यामुळे शिवकर समाजाने प्रकल्पात सहकार्य करण्याची मागणी त्यांनी शेवटी केली.

Web Title: The question of Vesay Khadi will be solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.