शेतकऱ्यांपुढे जगावं की मरावं हा सवाल - नाना पाटेकर यांची खंत
By admin | Published: March 6, 2016 01:02 AM2016-03-06T01:02:35+5:302016-03-06T01:02:35+5:30
जगावं की मरावं, हा एकच सवाल सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. कर्जमाफीने त्यांच्या समस्या मिटणार नाहीत. त्यांना शेतीसाठी केवळ वीज, पाणी आणि शेतीमालाला हमीभाव हवा आहे.
पुणे : जगावं की मरावं, हा एकच सवाल सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. कर्जमाफीने त्यांच्या समस्या मिटणार नाहीत. त्यांना शेतीसाठी केवळ वीज, पाणी आणि शेतीमालाला हमीभाव हवा आहे. शेती टिकवायची असेल, तर पाणी अडवण्यापेक्षा ग्रामीण भागातील मुलांसाठी ‘अडवा आणि जिरवा’ योजना अमलात आणली पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.
सिंबायोसिस स्पोटर््स सेंटरतर्फे क्रीडाभूषण पुरस्कार रायफल शूटर दीपाली देशपांडे यांना पाटेकर यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शां.ब.मुजुमदार अध्यक्षस्थानी होते. यावेळी अस्थिरोगतज्ज्ञ पराग संचेती, सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, सिंबायोसिस स्पोर्टस सेंटरचे मानद संचालक डॉ. सतीश ठिगळे आदि मान्यवर उपस्थित होते.
पाटेकर म्हणाले, ‘कारण, आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करण्याची क्षमता तरुणांमध्ये आहे. पारंपरिक शेतीने आता शेतक-यांचे भले होणार नाही. नाम फाऊंडेशनच्या निमित्ताने सुख- दु:खाच्या ख-या व्याख्या समजू लागल्या आहेत. राजकारण्यांना नावे ठेवण्यात वेळ वाया न घालवता शेतक-यांना मदत करण्याच्या निमित्ताने मरेपर्यंत जगण्यासाठी एक कारण मिळाले आहे.’
अभिनेत्याच्या मनातील भावनांचा कल्लोळ शब्दबध्द करताना नाना पाटेकर म्हणाले, ‘खेळामध्ये भावना बाजूला ठेवाव्या लागतात. अभिनेता मात्र इतरांच्या भावना, दु:खे घेऊन जगत असतो. त्याला स्वत:च्या भावना बाजूला ठेवाव्या लागतात. अभिनेत्याचा प्रवास हा अश्वत्थाम्यासारखा असतो. प्रत्येक देशाची भावनिक आंदोलने वेगवेगळी असतात. पण, आपण जसे आहोत, तसेच राहणारा नट खरा कलाकार असतो. कारण, अभिनय एका चौकटीत बांधील राहू शकत नाही. त्याची लाटच आली पाहिजे.
मुजुमदार म्हणाले, ‘जगण्यासाठी श्रीमंती नव्हे तर दिलदार ह्रदय लागते. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेकांचे अश्रू पुसायला मदत होईल.’
नानांच्या पुण्यकार्यात खारीचा वाटा म्हणून सिंबायोसिसच्या वतीने नाम फाऊंडेशनला दहा लाखांचा तसेच संजीवनी मुजुमदार यांच्या वतीने वैयक्तिक एक लाख रुपयांचा निधी सुपूर्त करण्यात आला.
यावेळी दीपाली देशपांडे म्हणाल्या, ‘‘२०२० नंतरच्या आॅलिंपिकमध्ये प्रत्येक विभागात भारताला किमान एक पदक मिळावे, अशी माझी इच्छा आहे. त्यादृष्टीने लक्ष्य फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण घेण्याचे काम सुरु आहे.’’
यावेळी ज्ञानदा तायडे या विद्यार्थिनीने आपल्या खाऊचे पैसे वाचवून नाम फाऊंडेशनसाठी धनादेश दिला. स्वाती दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)