हटवादावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे ढोंगी धर्मनिरपेक्षता ठरते का - राजदीप सरदेसाईंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By admin | Published: September 23, 2015 04:18 PM2015-09-23T16:18:04+5:302015-09-23T16:37:25+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतसाठी लिहीलेल्या खास पत्राला ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Questioning the issue of misdemeanor is the secularism of Dhondi - Rajdeep Sardesai's Chief Minister questioned | हटवादावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे ढोंगी धर्मनिरपेक्षता ठरते का - राजदीप सरदेसाईंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

हटवादावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे ढोंगी धर्मनिरपेक्षता ठरते का - राजदीप सरदेसाईंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २३ -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमतसाठी लिहीलेल्या खास पत्राला ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. हटवाद, फाजील धर्माभिमानावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे ढोंगी धर्मनिरपेक्षता ठरते का असा सवाल राजदीप सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. 
ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक खुले पत्र लिहीले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी खास लोकमतसाठी लिहीलेल्या पत्राद्वारे राजदीप सरदेसाई यांना प्रत्युत्तर दिले होते. बुधवारी राजदीप सरदेसाई यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. एखाद्या मोठ्या नेत्याने माझ्यासारख्या पत्रकाराच्या लेखावर उत्तर देणं ही कौतुकाची बाब असून सध्या असे घडताना दिसत नाही. याऊलट माध्यमांनाच टीकेचे लक्ष्य केले जाते. माझ्या पत्राला तुम्ही उत्तर देऊन लोकशाहीत खुल्या चर्चेला सुरुवात केली असे सांगत सरदेसाई यांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. 
गोवंश हत्याबंदी निर्णयावर राजदीप सरदेसाई म्हणाले,  राज्यात फडणवीस सरकार आल्यावर गोवंश हत्याबंदीचा निर्णय लागू झाला. पण यात या व्यवसायाशी संबंधीत असलेल्यांची मतं जाणून घेण्यात आली नव्हती. परिणामी सरकारच्या एका निर्णयामुळे गोमांस व्यवसायातील हजारो जण एका क्षणात बेरोजगार झाले याकडे सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. यातील बहुसंख्य जण हे अल्पसंख्याक समुदायातील होते असेही सरदेसाई यांनी निदर्शनास आणून दिले आहे. 
मांसबंदीचा निर्णय आधीच्या सरकारने घेतला होता असे मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटले होते. यावर राजदीप सरदेसाई म्हणतात, जैन धर्मियांच्या पर्युषणादरम्यान दोन दिवसांच्या मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय पूर्वीच्या सरकारने घेतला होता. जैन धर्मियांच्या दबावापुढे नमते घेत हा निर्णय झाला होता. या निर्णयाची सक्तीने अंमलबजावणी झाली नव्हती. पण भाजपाची सत्ता असलेल्या मिरा भाईंदर महापालिकेने यंदा पर्युषणा दरम्यान मांसविक्रीवर थेट आठ दिवसांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला व ही बंदी सक्तीने राबवली जाणार होती. भाजपातील काही आमदारांना हा निर्णय मुंबई महापालिकेतही लागू  करायचा होता. मात्र शिवसेना - मनसेकडून विरोध झाल्याने भाजपाला मांसविक्रीवरील बंदीच्या निर्णयावरुन माघार घ्यावी लागली असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.  राज्यातील भाजपाला मांसविक्रीवरील बंदीचा निर्णय पूर्वीपेक्षा अधिक सक्तीने राबवायचा होता. यावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे बेगडी धर्मनिरपेक्षता ठरते का असा सवालच त्यांनी उपस्थित केला.  
राकेश मारिया प्रकरणावरही सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्या दाव्यांवर आक्षेप घेतला. सणासुदीच्या काळात आयुक्तांची बदली करण्याऐवजी त्यापूर्वीच नवीन आयुक्त नेमून आयुक्ताला स्थिर होण्यास वेळ दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. मात्र मी अनेक माजी आयपीएस अधिका-यांशी यावर चर्चा केली, पण त्यांनादेखील हा दावा पटलेला नाही असे सरदेसाई यांनी नमूद केले. शीना बोरा प्रकरणात महत्त्वाचे पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून केला जात असताना अचानक हा तपास सीबीआयकडे का सोपवण्यात आला असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. देशद्रोहा संदर्भातील परिपत्रक तुमच्या सरकारने मागे का घेतले नाही असाही सवाल सरदेसाई यांनी उपस्थित केला.   
शेतक-यांच्या प्रश्नावरही सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले आहेत. विदर्भातील नेते असल्याने तुम्हाला शेतक-यांच्या प्रश्नांची जाणीव असेल, विरोधी बाकावर असताना सिंचन घोटाळा उघड करण्यात तुमची भूमिका मोलाची होती. जलयुक्त शिवार योजनेसाठी तुमचे प्रयत्नही मला माहित आहे, पण मराठवाड्यात जानेवारीपासून ७२९ शेतक-यांनी आत्महत्या केली ही वस्तुस्थिती आहे. टँकर माफिया, सावकार यांचे राज्य अजूनही दिसून येते असे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. 
मी डाव्या विचारसरणीचा, ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांच्या पत्रात दिसून येतो. स्वतंत्र विचारधारेच्या शक्तीवर माझा विश्वास असून सर्व भारतीयांना समानसंधी मिळायला पाहिजे असे मला वाटत असल्याचे सरदेसाई यांनी म्हटले आहे. 

Web Title: Questioning the issue of misdemeanor is the secularism of Dhondi - Rajdeep Sardesai's Chief Minister questioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.