प्रशासनाच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह
By admin | Published: May 30, 2016 01:21 AM2016-05-30T01:21:02+5:302016-05-30T01:21:02+5:30
महापौर प्रशांत जगताप यांच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने शहरामध्ये झालेल्या खोदाईची तपासणीत कुठेच बेकायदेशीर खोदाई आढळून आली नाही
पुणे : महापौर प्रशांत जगताप यांच्या आदेशानुसार महापालिका प्रशासनाने शहरामध्ये झालेल्या खोदाईची तपासणीत कुठेच बेकायदेशीर खोदाई आढळून आली नाही. मात्र, बेकायदेशीर खोदाई झाल्याचे नागरिकांकडून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले जात असल्याने महापालिकेने केलेल्या तपासणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरामध्ये नव्याने तयार करण्यात आलेले रस्ते, फुटपाथ उखडून खोदाई होत असल्याचे अनेक प्रकार उजेडात आल्यानंतर महापौरांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या सर्व खोदाईची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनास दिले होते.
पथ विभागातील अधिकाऱ्यांनी शहरात झालेल्या सर्व खोदाईची तपासणी केली, त्यामध्ये त्यांना कुठेही बेकायदेशीर खोदाई झाल्याचे आढळून आले नाही. त्याबाबतचा अहवालही त्यांनी महापौरांकडे सादर केला. मात्र, अनेक ठिकाणी बेकायदा खोदाई झाल्याचे नागरिकांकडून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले जात आहे.
महापालिकेची मोठी यंत्रणा दिमतीला असलेल्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून कुठेच बेकायदेशीर खोदाई आढळून येत नाही. त्याचवेळी नागरिकांकडून बेकायदेशीर खोदाई झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले जात आहे. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या तपासणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून खरंच तपासणी केली आहे का, किंवा तपासणी करून बेकायदेशीर प्रकार लपविले गेले का, असे प्रश्न यामुळे निर्माण झाले आहेत.
खोदाईची कामे वेगाने मार्गी लागावीत यासाठी मोबाइल कंपन्यांकडून अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचे प्रकार उजेडात आले आहेत. बेकायदेशीर खोदाईला विरोध करणाऱ्या महापालिकेतील एका अतिरिक्त आयुक्तांची बदली मोबाइल कंपनीच्या दबावातून झाल्याचा प्रकारही उजेडात आला आहे.
स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वडगावशेरीतील नागरिक श्रीधर गलांडे यांनी खराडी बायपास ते मुंढवा रस्त्यादरम्यान खोदाई केली असल्याची तक्रार पथ विभागाकडे केली. या तक्रारीची तपासणी केल्यानंतर बेकायदेशीरपणे खोदाई झाल्याचे समोर आले आहे. आता पथ विभागाकडून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
त्याचबरोबर सहकारनगर परिसरात मोबाइल कंपन्यांकडून परवानगी घेतल्यापेक्षा जास्त खोदाई झाल्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते ऋषीकेश बालगुडे यांनी निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार संबंधितांविरूद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अशा अनेक तक्रारी पथ विभागाकडे आल्या आहेत.