‘महाज्योती’च्या योजनांच्या नियोजनातील त्रुटींमुळे प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 08:58 AM2021-05-31T08:58:11+5:302021-05-31T08:58:25+5:30
पीएच.डी.धारकांच्या समस्या सुटेनात : विद्यार्थ्यांना विद्यावेतनाची प्रतीक्षा
नागपूर : ओबीसी व व्हीजेएनटीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य, गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन आदींसाठी स्थापना करण्यात आलेल्या ‘महाज्योती’द्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या नियोजनातच त्रुटी असल्याने एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पीएच.डी.धारक, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, उच्च शिक्षणासाठी आयोजित प्रवेशपूर्व कोचिंग घेणारे विद्यार्थी असोत की यूपीएससीचे विद्यार्थी; या सर्वांकडून ‘महाज्योती’च्या संचालनकर्त्यांवर ठपका ठेवण्यात येत आहे.
ओबीसीचे ८० विद्यार्थी यूपीएससीच्या परीक्षेत मुलाखतीसाठी पात्र झाले आहे. महाज्योतीने विद्यावेतन देण्यासाठी ५ ते २५ एप्रिलदरम्यान अर्ज मागितले होते. ८० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली; पण विद्यावेतनाबाबत काहीच निर्णय झाला नाही.
या आहेत पीएच.डी.धारकांच्या मागण्या
महाज्योतीने संशोधन करण्यासाठी जाहिरात काढली. त्यात अर्ज स्वीकारण्याची तारीख ३० मे होती. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र गोळा करणे शक्य झाले नाही. सारथीने मुदतवाढ दिली; पण महाज्योतीने दिली नाही.
महाज्योती केवळ २०१९ मध्ये नोंदणी केलेल्या पीएच.डी.धारकांनाच लाभ देणार आहे. त्यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश करावा.
सारथीमध्ये संशोधनासाठी ५०० जागा आहेत; पण महाज्योतीत व्हीजेएनटी व ओबीसीचा समावेश असताना केवळ १५० जागा आहेत. किमान ७०० जागा कराव्यात. बार्टी आणि सारथीएवढेच पीएच.डी.धारकांना विद्यावेतन द्यावे.
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणही अपुरेच
पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण १० हजार युवकांना देण्यात येणार होते. चार हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. केवळ १०० विद्यार्थी ऑनलाईन प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षण देणाऱ्यांना अनुभव नाही. प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा होता. त्यात टॅब्लेट देण्यात येणार होते. त्याबाबतचे काहीच नियोजन नाही.
पीएच.डी. धारकांच्या समस्या कायमच
‘सारथी’ची स्थापना २०१८ मध्ये झाली आणि महाज्योतीचीसुद्धा याच वर्षी नोंदणी झाली. मराठा कुणबी समाजासाठी काम करणाऱ्या सारथीने पीएच.डी.धारकांना सर्व लाभ दिले; पण महाज्योती पीएच.डी.धारकांचे प्रश्नच सोडवू शकली नाही.
- किरण वर्णेकर, पीएच.डी.धारक
विमुक्त भटक्यांचा केवळ नावापुरता समावेश
महाज्योतीमध्ये विमुक्त भटक्या जातिजमातीचा समावेश आहे. भटक्यांची शैक्षणिक पातळी अत्यल्प आहे. त्यामुळे योजनांचा लाभ केवळ ओबीसीचे विद्यार्थी घेऊ शकतात. मच्छीमार, बेलदार, पारधी, कैकाडी, नाथजोगी, गोसावी, मशानजोगी या जमातींवर संशोधनाचे कार्य होणे गरजेचे आहे.
- गजानन चंदावार,
संघटक, युवा संघर्ष वाहिनी