एम.कॉम.च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी
By admin | Published: June 11, 2015 11:00 PM2015-06-11T23:00:08+5:302015-06-12T00:36:04+5:30
‘लोकमत’चा प्रभाव : विद्यापीठाच्या बैठकीत ८० पैकी गुण देण्याचा निर्णय
संदीप आडनाईक -कोल्हापूर -शिवाजी विद्यापीठाने एम. कॉम. (भाग एक)च्या दुसऱ्या सत्रातील ५ मे २0१५ रोजी झालेल्या अॅडव्हान्स अकौन्टसी विषयातील टॅक्सेसन (पेपर क्रमांक चार) या पेपरला चुकीचा आराखडा दिल्याचे विद्यापीठाने मान्य केले आहे. यासंदर्भात ५ जूनला परीक्षा नियंत्रक कार्यालयात झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांना १६ गुणांऐवजी २0 गुणांचे प्रश्न गृहित धरून सोडविलेल्या प्रश्नातील अधिकतम गुणांच्या आणि प्रश्नांची बेरीज करून ८0 पैकी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एम.कॉम.च्या या विषयाच्या विद्यार्थ्यांना चुकीचा आराखडा आल्यामुळे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २७00 विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने २९ मे रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. यासंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ५ मे रोजी विद्यापीठाकडे तक्रार केली होती. या प्रश्नावरील उत्तराचा आग्रह आणि पाठपुरावा परिषदेने केला होता. संबंधित विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाचच प्रश्न प्रस्ताव नियोजकाने दिल्याचे मान्य केले आहे. यासंदर्भात परीक्षा नियंत्रक एम. ए. काकडे यांच्या कार्यालयात बैठक बोलाविली होती.
यावेळी वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. आर. जी. फडतरे, अकौन्टन्सी अँड आॅडिटिंग अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. पी. व्ही. मोहिते, अधिसभा सदस्य अमित कुलकर्णी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे रतन कांबळे, अमित वैद्य, प्रा. शंकरराव कुलकर्णी, प्रश्नसंच नियंत्रक डॉ. एम. आर. थिटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
असा झाला निर्णय
विद्यापीठाने यासंदर्भात घेतलेल्या अंतिम निर्णयानुसार एम.कॉम. (भाग एक) च्या दुसऱ्या सत्रातील ५ मे २0१५ मध्ये झालेल्या अॅडव्हान्स अकौन्टसी विषयातील टॅक्सेशन (पेपर क्रमांक चार) प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्न १६ गुणांच्या प्रश्नाऐवजी २0 गुणांचे गृहित धरावे व विद्यार्थ्याने सोडविलेल्या एकूण प्रश्नांपैकी ज्या चार प्रश्नांच्या उत्तराला सर्वाधिक गुण प्राप्त होतील, ते गुण देऊन त्यांचा परीक्षेचा निकाल जाहीर करावा, असा निर्णय झाला.