नागपूर कारागृहात क्विक रिस्पॉन्स टीम
By Admin | Published: July 26, 2015 02:11 AM2015-07-26T02:11:19+5:302015-07-26T02:11:19+5:30
दहशतवादी हल्ल्यासह कोणत्याही प्रकारच्या स्थितीला निपटून काढण्यात सक्षम असलेल्या क्विक रिस्पॉन्स टीमने (क्यूआरटी) कारागृहाचा आतमधील परिसर शनिवारी ताब्यात घेतला.
- नरेश डोंगरे, नागपूर
दहशतवादी हल्ल्यासह कोणत्याही प्रकारच्या स्थितीला निपटून काढण्यात सक्षम असलेल्या क्विक रिस्पॉन्स टीमने (क्यूआरटी) कारागृहाचा आतमधील परिसर शनिवारी ताब्यात घेतला. नि:शस्त्र आणि सशस्त्र अशा दोन्ही प्रकारच्या हल्ल्याला तोंड देण्याची क्षमता असलेल्या निष्णात जवानांचा त्यात समावेश आहे. ‘आॅपरेशन याकूब’ संपेपर्यंत हे पथक आता कारागृहाच्या आतमध्येच राहणार आहे.
राज्यपालांकडे दयेचा अर्ज आणि सर्वोच्च न्यायालयात डेथ वॉरंट बेकायदेशीर असल्याचे सांगणारी याचिका दाखल करून याकूब मेमनने फाशी टाळण्यासाठी धडपड चालवली आहे. फाशी प्रकरणाचे राजकारण केले जात असल्यामुळे देशभरात उलटसुलट प्रतिक्रिया नोंदविल्या जात आहेत. दुसरीकडे याकूबला फासावर चढविण्यासाठी कारागृह प्रशासनाने तयारी केली आहे. याकूबच्या फाशीला स्थगिती मिळावी म्हणून कारागृहात माओवाद्यांनी अन्न घेण्यास नकार देऊन उपोषण केले आहे. ही एकूणच विसंगत स्थिती असताना याकूबला फाशी देण्यापूर्वी किंवा फाशी दिल्यानंतर ‘गडबड’ होऊ शकते, असा ‘अलर्ट’ गुप्तचर यंत्रणेकडून मिळाल्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर, शनिवारी सायंकाळी शहर पोलीस दलाची क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) कारागृहात दाखल झाली. १० जणांचे हे पथक अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज आहे. दहशतवादी हल्ल्यासारखी किंवा तशीच कोणतीही स्थिती ऐनवेळी निर्माण झाली तर ती निपटून काढण्यात हे पथक सक्षम असते. शनिवारी सायंकाळी मध्यवर्ती कारागृहाच्या आतमधील परिसरात क्यूआरटी तैनात करण्यात आली. याकूब प्रकरणाचा ‘निकाल’ लागेपर्यंत रात्रंदिवस हे पथक कार्यरत राहील. कारागृह अधीक्षकांच्या कार्यालयाजवळ ते तैनात असेल.