मेंढपाळांवरील हल्ले त्वरीत रोखा, अन्यथा रस्त्यावर उतरु; महाराष्ट्र यशवंत सेनेचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 08:41 PM2020-08-03T20:41:44+5:302020-08-03T20:42:38+5:30

मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी ६ ऑगस्टला राज्यभरात जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयवर निवेदन देणार

Quickly stop attacks on shepherds Demand Maharashtra Yashwant Sena warns the government | मेंढपाळांवरील हल्ले त्वरीत रोखा, अन्यथा रस्त्यावर उतरु; महाराष्ट्र यशवंत सेनेचा सरकारला इशारा

मेंढपाळांवरील हल्ले त्वरीत रोखा, अन्यथा रस्त्यावर उतरु; महाराष्ट्र यशवंत सेनेचा सरकारला इशारा

Next
ठळक मुद्देमेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात यावी.मेंढपाळ बांधवांच्या विध्यार्थांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र होस्टेल तयार करण्यात याव्यात.प्रत्येक मेंढपाळ बांधवाना फिरते रेशनकार्ड मिळावे.

मुंबई - राज्यातील मेंढपाळ बांधवांवरती होणारे हल्ले, अन्याय व अत्याचार विरोधात स्वतंत्र कडक कायदा करा, मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करा अशी मागणी महाराष्ट्र यशवंत सेनेने केली आहे स्वतः ची शेती नसल्यामुळे किंवा पुरेश्या चाऱ्या अभावी आपले गाव सोडून गावोगावी भटकंती करून मेंढपाळ आपला उदरनिर्वाह करतात मात्र या मेंढपाळ बांधवांवरती गेल्या काही दिवसांपासून स्थानिक गावगुंड, टवाळखोर यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण खूप वाढलेले आहे असा आरोप महाराष्ट्र यशवंत सेनेने केला आहे.

याबाबत महाराष्ट्र यशवंत सेनेचे सरचिटणीस संतोष वाघमोडे म्हणाले की, बरेच ठिकाणी मेंढपाळांवरील हल्ल्याची तक्रार तर लांबच साधी दखल ही स्थानिक गावगुंडांच्या राजकीय आर्थिक दबावामुळे पोलीस प्रशासन घेत नाही. सद्य स्थितीत राज्यात रोज अशी दोन ते तीन प्रकरणे  कुठे तरी घडतच आहेत.  शेतीव्यवसाय प्रमाणेच फार मोठ्या प्रमाणात मेंढपाळ हा व्यवसाय राज्यात केला जातो. म्हणून या गोष्टीची व मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी ६ ऑगस्टला राज्यभरात जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयवर निवेदन देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

काय आहेत मेंढपाळांच्या प्रमुख मागण्या?

१) मेंढपाळांच्यावर हल्ला, अन्याय व‌ अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी ऐट्रोसिटी सारखा स्वतंत्र कायदा व्हावा व त्वरित रू ५ लाखाचे अर्थ सहाय्य मिळावे.

२) मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात यावी.

३) मेंढरांची विक्री होण्यासाठी पूर्वी प्रमाणे जनावरांचे आठवडे बाजार त्वरित सुरू करावेत.

४) महाराष्ट्रात मेंढपाळांसाठी चराऊ कुरणे आरक्षित करून ती मेंढपाळांसाठी खुली करण्यात यावीत. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये चारा छावणी सुरू करण्यात याव्यात

५) नैसर्गिक आपत्ती किंवा हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात आणि रस्ते अपघातात होणाऱ्या नुकसानाची भरपाई कोणतीही आडकाठी न येता त्वरीत मेंढपाळच्या खात्यात मिळावी.

६) प्रत्येक मेंढपाळ बांधवाना फिरते रेशनकार्ड मिळावे.

७) मेंढपाळ लोकांना मेंढ्या खरेदी साठी विशेष अनूदान व बिनव्याजी कर्ज मिळावे.

८) आजपर्यंत अनेक मेंढपाळांवर अन्याय,अत्याचार व हल्ल्याच्या घटनांचे कोर्टात केस चालू आहेत त्या फास्टट्रॅक कोर्टात घेऊन दोषीना त्वरीत शिक्षा मिळावी.

९) मेंढपाळ बांधवांच्या विध्यार्थांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र होस्टेल तयार करण्यात याव्यात.

१०) पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी विकास व उद्योजकता महामंडळावरती प्रत्यक्ष मेंढपाळबांधवांना काम करण्याची संधी मिळावी.

या सर्व मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा येत्या काळात मेंढपाळ बांधवांच्या सन्मासाठी महाराष्ट्र‌ यशवंत सेनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा विषय झाला तर याची सर्वस्वी जवाबदारी शासनाची असेल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र यशवंत सेनेचे प्रमुख राजू झंजे यांनी दिली आहे.

Web Title: Quickly stop attacks on shepherds Demand Maharashtra Yashwant Sena warns the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.