आर (उत्तर) - माजी नगरसेवकांना संधीची दारे खुली

By admin | Published: January 31, 2017 03:30 PM2017-01-31T15:30:42+5:302017-01-31T15:30:42+5:30

आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर दहिसरच्या आर (उत्तर) विभागात आता सर्वपक्षीय उमेदवारांनी अभूतपूर्व अशी मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू केली

R (North) - Opportunity doors open to former corporators | आर (उत्तर) - माजी नगरसेवकांना संधीची दारे खुली

आर (उत्तर) - माजी नगरसेवकांना संधीची दारे खुली

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई - आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर दहिसरच्या आर (उत्तर) विभागात आता सर्वपक्षीय उमेदवारांनी अभूतपूर्व अशी मोर्चेबांधणी आतापासूनच सुरू केली आहे. या विभागात पूर्वी ७ प्रभाग होते. आता एक प्रभाग वाढल्याने येथील प्रभागसंख्या वाढली आहे. प्रभाग २ आणि ८ हा खुल्या वर्गासाठी तर १, ४, ७ हे प्रभाग महिलांसाठी आणि प्रभाग क्र. ५, ६, १० हे इतर मागासवर्गीय जातीसाठी राखीव झाले आहेत.

प्रभाग आरक्षणाचा मोठा फटका हा शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांना बसला आहे. आर (मध्य) आणि आर (उत्तर) प्रभाग समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, माजी महापौर आणि विद्यमान नगरसेविका डॉ. शुभा राऊळ आणि नगरसेवक अभिषेक घोसाळकर या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या प्रभागाचे विभाजन होऊन नवीन ७ क्रमांकाचा प्रभाग वाढला आहे. पूर्वीचा प्रभाग क्र. २ हा आता खुल्या वर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे प्रभाग क्र. १ किंवा आता प्रभाग क्र. ७ हा महिलांसाठी राखीव आहे. प्रभाग २ हा प्रामुख्याने गुजराती भाषिक मतदारांचे प्राबल्य असलेला विभाग आहे. त्यामुुळे शीतल म्हात्रे यांनी आपल्या पूर्वीच्या प्रभाग क्र. २ मधून निवडणूक लढवावी, असा प्रवाह सध्या दिसून येतो. डॉ. शुभा राऊळ यांचे प्रभाग क्र. ८ मध्ये नाव चर्चेत आहे. तर अभिषेक घोसाळकर यांचे नाव प्रभाग क्र. ८मध्ये तर त्यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांचे नाव प्रभाग क्र. ७ साठी चर्चेत आहे. शिवसेनेचे नगरसेवक उदेश पाटेकर यांचा प्रभाग आता महिलांसाठी खुला झाल्यामुळे ते पत्नी सुजाता पाटेकर यांच्यासाठी इच्छुक असल्याचे समजते. तर येथून शिवसेना महिला उपविभाग संघटक मीना पानगंद आणि मनसेतून संजना घाडी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख प्रकाश कारकर हे प्रभाग क्र. ६ मध्ये तर शिवसेना उपविभागप्रमुख आणि माजी नगरसेवक भालचंद्र म्हात्रे हे प्रभाग क्र. २मध्ये इच्छुक असल्याचे समजते. म्हात्रे हे येथील विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष आहेत. आता ते आपल्या जुन्या प्रभागातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे समजते.

दहिसर विधानसभेच्या आमदार मनीषा चौधरी या सध्या प्रभाग क्र. ९च्या नगरसेविका आहेत. त्यांच्या पूर्वीचा प्रभाग हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यामुळे प्रभाग क्र. १० येथून भाजपा नवीन उमेदवाराच्या शोधात असल्याचे समजते. तर येथून शाखाप्रमुख मिलिंद म्हात्रे इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर आमदार मनीषा चौधरी यांच्या घरातून मुलगा आणि पती यांच्यापैकी कोणाला तरी उमेदवारी मिळेल, अशी विभागात चर्चा आहे. मात्र मनीषा चौधरी यांनी याचा इन्कार केला.

मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा या सध्या प्रभाग क्र. ३च्या नगरसेविका आहेत. आता त्या त्यांचा पूर्वीचा प्रभाग क्र. १मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे, तर शिवसेनेच्या गोटातून दीपा पाटील यांचे नाव चर्चेत आहे.

अलीकडेच काँग्रेसमधून मुंबई भाजपा अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार आणि खासदार गोपाळ शेट्टी यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलेल्या माजी महापौर हरेश्वर पाटील यांच्या स्नुषा योगिता पाटील या भाजपातर्फे प्रभाग क्र. ७ मधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

प्रभाग क्र. ३ मधून काँग्रेसचे माजी नगरसेवक दिवंगत राजेंद्रकुमार चौबे यांचा मुलगा अभय चौबे यांचे नाव तर शिवसेनेतर्फे येथे उपविभागप्रमुख बाळकृष्ण ब्रीद यांची नावे चर्चेत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अलीकडेच दहिसर स्विमिंग पुलाच्या उद्घाटनामुळे चर्चेत आलेले मनसेचे प्रभाग क्र. ५ चे नगरसेवक प्रकाश दरेकर हे कागदावर जरी मनसेचे नगरसेवक असले तरी तसे मनाने भाजपावासीय झाले आहेत. त्यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्यामुळे त्यांचा आता नव्या प्रभागाचा शोध सुरू आहे. प्रभाग क्र. ३ किंवा ११ मधून त्यांचे नाव चर्चेत आहे.

Web Title: R (North) - Opportunity doors open to former corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.