आर. आर. नाहीत हे पचवणं कठीण!
By admin | Published: February 17, 2015 02:04 AM2015-02-17T02:04:32+5:302015-02-17T02:04:32+5:30
आर. आर. पाटील यांचे निधन व्यक्तिश: मला, पक्षाला मोठा धक्का देणारी घटना आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेल्या या माणसाने पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभेत उत्कृष्ट काम केले.
आर. आर. पाटील यांचे निधन व्यक्तिश: मला, पक्षाला मोठा धक्का देणारी घटना आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेल्या या माणसाने पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभेत उत्कृष्ट काम केले. आमदार, विरोधी पक्षनेते, ग्रामीण विकास मंत्री, गृहमंत्री म्हणून त्यांनी कर्तृत्वाची झलक दाखविली.
आज स्वच्छता अभियानाची देशभर चर्चा होत आहे. मात्र त्यांनी १० वर्षांपूर्वीच ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना’च्या माध्यमातून मोठे काम केले. सार्वजनिक जीवनात कसे काम करावे, याचा ते आदर्श वस्तुपाठ होते. गृहमंत्री असताना त्यांनी राज्यातील सर्वांत मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मागून घेतले. तीन महिन्यांपासून ते आजारी होते. माझा एकही दिवस असा गेला नाही की मी त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी बोललो नाही. आर. आर. नाहीत ही गोष्ट पचवणं यासाठी बराच काळ लागेल.
राज्यात नेतृत्वाची एक नवी फळी तयार केली त्यात आबा एक महत्त्वाचे नेते होते. आम्ही सर्व एकाच कुटुंबातील आहोत, असेच आमचे नाते होते. आघाडीच्या सरकारमध्ये आबा उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली. मी आबांच्या प्रचाराला गेलो होतो. तेव्हा समोर बसलेल्या लोकांमध्ये ज्या दोन भगिनी आहेत त्यात आबांची पत्नी व आई असल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले. ते मंत्री असतानाही त्यांचे कुटुंब शेतात काम करायचे. सत्तेच्या परिघातही ते सामान्य माणसाप्रमाणे राहिले. त्यांनी त्यांचे कुटुंब मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी कधी आणले नाही. त्यांनी कधी बडेजाव मिरवला नाही.
मुंबईवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर पक्षाची बैठक झाली. सर्वांनी मिळून गृहमंत्र्यांनी हल्ल्याची जबाबदारी घ्यावी, असा निर्णय झाला. मात्र निर्णय होण्यापूर्वीच आबांनी अतिरेकी हल्ला मला अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. मला पदावरून मुक्त करावे, अशी भूमिका मांडली. सत्तेचा त्याग करणारी व्यक्ती आता आढळणे कठीण आहे.
धाडसी राजकारणी म्हणून ते ओळखले जात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मतभेदातून ते मार्ग काढत. सर्वसामान्य माणसाचे हित जपणे त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. - पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री
विश्वास बसणार नाही, अशी ही घटना आहे. नियतीच्या पलीकडे कोणाला जाता येत नाही. ते उत्कृष्ट वक्ते होते. मी मुख्यमंत्री असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते कायम समन्वय साधत. - अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
तळागाळाच्या माणसांशी संपर्क असलेला संवेदनशील नेता हरपला. कुठलीही संस्था, साखर कारखाना नसलेला हा राज्यस्तरीय नेता होता. शरद पवारांनी खऱ्या अर्थाने त्यांच्यातील नेतृत्वगुण हेरले. - विनोद तावडे, शिक्षणमंत्री
आबा माझे खूप जवळचे स्नेही होते. शुद्ध चारित्र्याचे स्पष्टवक्ते नेते होते. आमची राजकीय भूमिका वेगळी असली तरी आमच्यात स्नेहाचा एक बंध होता.
- एकनाथ खडसे, महसूल मंत्री
आर.आर. पाटील यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीची हानी झाली आहे. सामाजिक प्रश्नांची जाण असणारे ते संवेदनशील व्यक्ती होते. शेतकरी, कामगार आणि तळागळातील माणसांच्या वेदनेची त्यांना जाण होती.
- नितीन गडकरी,
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री
कोणताही मोठा राजकीय वारसा नसताना स्वकर्तृत्वाने मोठ्या पदापर्यंत आबांनी घेतलेली झेप प्रेरणादायी आहे. गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द संस्मरणीय ठरली. पक्ष मजबूत करण्यासाठीचे त्यांचे योगदान न विसरता येण्यासारखेच आहे.
- अजित पवार,
माजी उपमुख्यमंत्री
छोट्या कुटुंबातून, गरिबीतून आलेला हा आमचा नेता होता. ते पक्षाचे आधारस्तंभ होते. लाखो लोकांचे त्यांच्यावर मनापासून प्रेम होते.
- छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री
आर. आर. पाटील यांच्या निधनाने ग्रामीण जीवनाशी समरस व्यक्तिमत्त्वाला राज्य मुकले. गेली अनेक वर्षे व्यक्तिगत जीवनात आबा व मी एक जीवलग मित्र म्हणून वावरलो. ग्रामीण भागातील प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच त्यांचा पुढाकार राहिला. त्यांच्याकडे कामाचा मोठा व्याप होता. परंतु त्यांनी कधी कोणाला नाराज केले नाही. आपल्या भूमिकेवर ठाम राहणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत त्यांनी नेहमी सहकार्याची भूमिका घेतली.
- राधाकृष्ण विखे पाटील,
विरोधी पक्षनेते
आर. आर. पाटील यांच्या निधनाने ग्रामीण भागाची मोठी हानी झाली. सोज्ज्वळ, कष्टाळू स्वभावाच्या या माणसाने राजकारण, समाजकारणात एक वेगळा ठसा उमटवला होता. राजकीय विरोधक असले तरी त्यांनी सर्वांनाच मित्रत्वाची वागणूक दिली. ते माझे जवळचे स्नेही होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात प्रवरा परिसर व विखे कुटुंबीय सहभागी आहे.
- बाळासाहेब विखे पाटील, ज्येष्ठ नेते
जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे उपमुख्यमंत्री असा मोठा गौरवास्पद प्रवास करणाऱ्या आर. आर. पाटील यांनी आपल्या कर्तृत्वातून राज्यभर आपल्या कामाचा ठसा उमटविला. राजकारणातील साधे व सरळ व्यक्तिमत्त्व असलेल्या आबांनी प्रत्येक खात्याला नवी दृष्टी दिली. साधी राहणी व उच्च विचार असलेले आबा एक प्रामाणिक राजकारणी होते. त्यांचे व माझे मैत्रीचे संबंध राहिले. कधीही कुणाला न दुखावणाऱ्या आबांच्या जाण्याने समाजकारणात मोठी पोकळी
निर्माण झाली आहे. राज्याचे संवेदनशील नेतृत्व हरपले आहे.
- बाळासाहेब थोरात, माजी मंत्री
राजकीय स्तरावरील आमचा संघर्ष कधी व्यक्तिगत पातळीवर येऊ दिला नाही. अभ्यासूपणा, साधेपणा आणि माणुसकी जपणारा नेता म्हणून त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. त्यांच्या जाण्याने सांगली जिल्ह्याची व महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक हानी झाली आहे.
- संजय पाटील, खासदार
आर. आर. पाटील हे माझे धाकटे बंधू म्हणून जिल्ह्यालाच नव्हे, तर संपूर्ण राज्याला परिचित होते. त्यांच्या निधनाने व्यक्तिगत माझी व आमच्या कुटुंबाची मोठी हानी
झाली आहे.
- आ. पतंगराव कदम, माजी मंत्री
लोकांनी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या साधेपणावर प्रेम केले. आबांचा साधेपणा व त्यांची स्वच्छ प्रतिमा हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे भांडवल होते. राष्ट्रवादीचे भांडवल आबांच्या रूपाने गेले व महाराष्ट्राने एक प्रामाणिक नेता गमावला. आधी विलासराव नंतर गोपीनाथराव व आता आबा म्हणजे आर. आर. पाटील गेले. काय चालले आहे तेच कळत नाही.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
आर. आर. पाटील हे एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. विविध खटल्यांसंबंधी त्यांच्याशी चर्चा होत असे. एकदा चर्चा करण्यासाठी मला निवासस्थानी बोलावले. मात्र, तेथे वर्दळीमुळे बोलताच येत नव्हते. आम्ही ताज हॉटेलच्या दिशेने निघालो. परंतु, मी रोख रक्कम ठेवत नाही आणि आबांच्या खिशांतही अवघे ५० रुपये होते. ताजचा बेत रद्द केला. आबांच्या निधनाने एक चांगला माणूस आपण गमावला.
- उज्ज्वल निकम, सरकारी वकील
आबांच्या जाण्याने फार मोठी हानी झाली आहे. ते आदर्श व्यक्तिमत्त्व होते़ संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त अभियान या योजना त्यांनी खेड्यापाड्यांत राबविल्या. ग्रामविकास मंत्री असताना बैठका घेऊन ग्रामसभेला जादा अधिकार, बदल्यांचा कायदा, दप्तर दिरंगाई, नागरिकांची सनद आदी कायदे करण्यास त्यांनी मदत केली. मी कुणाच्या प्रचाराला गेलो नाही़ पण आबांच्या प्रचाराला गेलो होतो.
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक
ते अतिशय लोकप्रिय नेते होते. आपल्या मनमिळावू व पारदर्शी व्यक्तित्वाची छाप त्यांनी राज्याच्या राजकारणावर सोडली. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा व साधेपणा जोपसणारे ते सच्चे लोकसेवक होते. अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेल्या पाटील यांनी आयुष्यभर जनतेशी बांधिलकी राखली. त्यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राने उत्तम संसदपटू व सामाजिक कार्यकर्ता गमावला आहे. - सी. विद्यासागर राव, राज्यपाल
विधानसभेतील बुलंद आवाज आणि कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी हरपला. एक कार्यकर्ता ते राज्याचा उपमुख्यमंत्री हा त्यांचा बहुआयामी प्रवास राजकीय क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. - सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री
प्रामाणिक सद्गृहस्थ, सच्चा मित्र गमावला
आर. आर. पाटील अत्यंत गरिबीतून आणि परिश्रमातून राजकारणात आले आणि त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले. ते खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी होते. लोकांसाठी सतत झटणारा अत्यंत प्रामाणिक सद्गृहस्थ म्हणून आबांबद्दल माझ्या मनात आदराची भावना आहे. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री असताना त्यांनी कधी बडेजाव मिरवला नाही. रुग्णालयात शस्त्रक्रियेला जाताना त्यांनी कुटुंबीयांनादेखील कळवले नाही. कुटुंबीयांची मुंबईत गैरसोय होऊ नये, ही त्यांची प्रामाणिक भावना होती. माझे त्यांच्याशी रक्ताच्या नात्यापलीकडचे ऋणानुबंध होते. माझ्या सुखदु:खात ते नेहमी सोबत राहिले. ‘लोकमत’वर जिवापाड प्रेम करणारा मोठ्या मनाचा लोकप्रतिनिधी, सच्चा मित्र मी आज गमावला आहे.- खासदार विजय दर्डा,
चेअरमन, एडिटोरियल बोर्ड लोकमत वृतपत्र समूह
एक निष्कलंक व प्रामाणिक नेता हरपला. वागण्या-बोलण्यात साधेपणा नेहमीच जपणारे आबा सदैव तळागाळातील माणसांमध्ये रमले. ग्रामीण महाराष्ट्राशी नाते जपणारा हा नेता वक्तृत्वशैलीमुळे शहरी भागातही तेवढाच लोकप्रिय होता.
- रावसाहेब दानवे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष
राजकारणात राहून सज्जन राहणे भल्याभल्यांना जमत नाही. आर. आर. यांना ते जमले. सत्तेत राहूनही भ्रष्टाचाराचा शिंतोडा न उडणे यालाच आर. आर. पाटील म्हणतात. त्यांचे काही निर्णय चुकले असतील; पण हेतूबद्दल श्ांका घेता येत नाही. पक्षातर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.
- राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
आर. आर. पाटील यांच्या निधनाने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली आहे. ते नि:स्पृह नेते आणि मित्र होते. धडाडीच्या निर्णयांसाठी ते विरोधकांच्याही प्रशंसेला अनेकदा पात्र ठरले. सावकारांच्या जाचातून शेतकऱ्यांना मुक्त करणारा कायदा असो की डान्सबार बंदीचा निर्णय त्यातून त्यांची जनतेप्रतीची बांधिलकीच दिसून आली. उत्तम वक्ता, चांगला प्रशासक आणि नम्र स्वभावाचा सर्वसमावेशक राजकारणी अशी आबांची ओळख कायमची लक्षात राहील.
- सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
राजकीय विरोधक असतानाही माझी जन्मभूमी असलेला सांगली जिल्हा हा आम्हाला जोडणारा दुवा होता. आबा उपमुख्यमंत्री असताना कुष्ठपीडितांच्या सशक्तीकरण्यासाठी मी त्यांची अनेकदा भेट घेतली होती. या वेळी त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन आमच्या लढ्याला पाठबळ देणारा होता. अकाली काळाच्या पडद्याआड गेलेल्या या उमद्या नेत्याला माझी श्रद्धांजली.
- राम नाईक, राज्यपाल, उत्तर प्रदेश