आर. आर. यांच्यारूपाने जिल्ह्याला लाल दिवा शक्य
By admin | Published: December 9, 2014 11:47 PM2014-12-09T23:47:29+5:302014-12-09T23:52:35+5:30
संधीची चिन्हे : विरोधी पक्षनेतेपदासाठी शिफारस
सांगली : मंत्रिमंडळ सदस्यांच्या माध्यमातून जिल्ह्याला सातत्याने मिळणाऱ्या लाल दिव्याची परंपरा यंदा खंडित होते की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच, आर. आर. पाटील यांच्यारूपाने पुन्हा जिल्ह्याला लाल दिवा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीने पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंत्र्यांची खाण म्हणून सांगली जिल्ह्याला ओळखले जाते. राज्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाच्या पदांवर जिल्ह्यातील नेत्यांना संधी मिळाली. वसंतदादांच्यारूपाने मुख्यमंत्रीपदाचीही संधी मिळाली. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या परंपरेला यंदा खीळ बसली. पहिल्या शपथविधीत आणि मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्याला डावलण्यात आले. त्यामुळे जिल्ह्याला मंत्रिमंडळात संधी मिळणार की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. मात्र आता आर. आर. पाटील यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे करण्यात आले आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या गणिताचा विचार केला, तर राष्ट्रवादीच्या पारड्यात हे पद पडण्याचीही चिन्हे दिसत आहेत. तसे झाले तर जिल्ह्याला राष्ट्रवादीच्या माध्यमातून लाल दिवा मिळू शकतो.
पाटील यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री पदापासून मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. त्यामुळेच राष्ट्रवादीने त्यांचे नाव आता विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे केले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी कमकुवत झाली आहे. आठपैकी दोनच विधानसभा मतदारसंघात पक्षाला यश मिळाले. जिल्ह्यात चार जागांवर विजय मिळवून भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडून भाजपने जिल्ह्यात मोठे यश मिळवले, तरीही मंत्रिमंडळात जिल्ह्याला स्थान मिळालेले नाही. (प्रतिनिधी)