रा. सू. गवई यांचे निधन
By Admin | Published: July 26, 2015 04:04 AM2015-07-26T04:04:55+5:302015-07-26T04:04:55+5:30
केरळ व बिहारचे माजी राज्यपाल तसेच आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष व भारतीय राज्यघटनेचे भाष्यकार
नागपूर : केरळ व बिहारचे माजी राज्यपाल तसेच आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष व भारतीय राज्यघटनेचे भाष्यकार रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांचे शनिवारी दुपारी नागपुरात दीर्घ आजाराने निधन झाले.
ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी कमलताई, मुले न्यायमूर्ती भूषण व डॉ. राजेंद्र, मुलगी कीर्ती यांच्यासह सुना, जावई, नातवंड आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. रविवारी दुपारी ३ वाजता अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील दारापूर या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
दादासाहेब गवई गेल्या दीड वर्षापासून आजारी होते. ते चिरंजीव न्या. भूषण यांच्याकडे नागपुरात वास्तव्याला होते. काँग्रेसनगर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर शनिवारी दुपारी १.५० वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आंबेडकरी चळवळ व रिपब्लिकन पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. रुग्णालयातून त्यांचे पार्थिव न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खा. विजय दर्डा, आ. जोगेंद्र कवाडे, दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले, भूपेश थूलकर यांच्यासह विविध राजकीय पक्ष, समाज व संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आंबेडकरी समाजातील शेकडो लोकांनी दादासाहेबांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यानंतर दीक्षाभूमी येथे त्यांचे पार्थिव नागरिकांच्या दर्शनार्थ ठेवण्यात आले. यावेळीसुद्धा विविध राजकीय पक्ष, विविध संघटना व समाजातील नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेत आदरांजली व्यक्त केली.
भारतीय राज्यघटना आणि भारतीय राजकारणाचा सखोल अभ्यास असलेले संसदपटू म्हणून रामकृष्ण सूर्यभान ऊर्फ दादासाहेब गवई ओळखले जायचे. विचारांशी सुस्पष्टता आणि वैचारिक भूमिकांशी घट्ट बांधिलकी ठेवूनही सर्वच पक्षांच्या नेत्यांसोबत मैत्रीचे नाते जपणारे अजातशत्रू म्हणून दादासाहेब यांची ओळख होती. ३० आॅक्टोबर १९२९ रोजी अमरावती जिल्ह्णातील दारापूर येथे त्यांचा जन्म झाला. २९ नोव्हेंबर १९५९ मध्ये त्यांनी कमलतार्इंशी विवाह केला. १९५४ मध्ये त्यांनी नागपूर विद्यापीठाची पदवी घेतली. १९५६ पासून कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्याशी त्यांचा संबंध आला. १९५९ साली ते विदर्भ रिपब्लिकन पार्टीचे सेक्रेटरी झाले. १९७२ मध्ये रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली. १९७२ मध्ये दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे ते अध्यक्ष झाले. अमरावती येथील आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान होते.
आज दारापुरात अंत्यसंस्कार
रा.सू. गवई यांचे पार्थिव दीक्षाभूमी येथे नागरिकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले. बौद्ध-आंबेडकरी समाजातील नागरिकांसह विविध राजकीय पक्षांचे नेते व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी दीक्षाभूमीवरून त्यांचे पार्थिव अमरावतीला नेण्यात आले.
दलितांचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड
मुंबईहून पुण्याला जाताना वाटेत गवईंच्या निधनाची बातमी कळली आणि त्यांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचा पट डोळ््यांपुढे तरळला. मी १९७१ साली राजकारणात आलो, तेव्हा त्यांना भेटलो. त्यानंतर आजतागायत त्यांचा सहवास हवाहवासा वाटत राहिला.विधान
परिषदेचे उपसभापती असताना सभागृहात खेळीमेळीचे वातावरण राहील, याकडे ते कटाक्षाने लक्ष देत असत.
१९९८ साली महाराष्ट्रातून आम्ही पाच दलित खासदार खुल्या जागांवरून लोकसभेवर निवडून गेलो होतो. त्यात गवईही होते. त्यावेळी वाजपेयी सरकारने राज्यघटनेत बदल करण्याचा घाट घातला होता. त्याला विरोध करण्यासाठी तत्वाला मुरड घालून गवईही आमच्यासोबत अध्यक्षांच्या आसनाच्या पुढ्यातील हौद्यात धाव घेऊन आले होते.
दलितांच्या लढ्यात सदैव अग्रणी राहिलेले नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. दलित वर्ग अनेक वशर््े त्यांची आठवण काढत राहील, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार श्ािंदे यांनी दिली.
दलितांचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड
मुंबईहून पुण्याला जाताना वाटेत गवईंच्या निधनाची बातमी कळली आणि त्यांच्या ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीचा पट डोळ््यांपुढे तरळला. मी १९७१ साली राजकारणात आलो, तेव्हा त्यांना भेटलो. त्यानंतर आजतागायत त्यांचा सहवास हवाहवासा वाटत राहिला.विधान
परिषदेचे उपसभापती असताना सभागृहात खेळीमेळीचे वातावरण राहील, याकडे ते कटाक्षाने लक्ष देत असत.
१९९८ साली महाराष्ट्रातून आम्ही पाच दलित खासदार खुल्या जागांवरून लोकसभेवर निवडून गेलो होतो. त्यात गवईही होते. त्यावेळी वाजपेयी सरकारने राज्यघटनेत बदल करण्याचा घाट घातला होता. त्याला विरोध करण्यासाठी तत्वाला मुरड घालून गवईही आमच्यासोबत अध्यक्षांच्या आसनाच्या पुढ्यातील हौद्यात धाव घेऊन आले होते.
दलितांच्या लढ्यात सदैव अग्रणी राहिलेले नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. दलित वर्ग अनेक वशर््े त्यांची आठवण काढत राहील, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार श्ािंदे यांनी दिली.
सर्वांना सोबत घेऊन
चालणारे व्यक्तिमत्त्व
रा.सू. गवई हे १९६४ ते १९९४ असे सलग ३० वर्षे विधान परिषदेचे सदस्य होते. विधान परिषदेचे ते लोकप्रिय व ज्येष्ठ सदस्य होते. तरीदेखील तरुणांशी त्यांचा चांगला संवाद व्हायचा. गवई यांच्या बंगल्यात सतत गजबज असे. पत्रकारांशीदेखील ते आपुलकीने वागायचे व तरुण पत्रकारांना तर विशेष मार्गदर्शन करायचे. विधान परिषदेत गवई यांचा पानाचा डब्बा सभागृहातच नव्हे, तर सभागृहाबाहेरदेखील फिरत असे. अस्सल जर्दा टाकलेलं पान व लवंग, विलायची, केशर असलेला डबा पत्रकारांमध्ये लोकप्रिय होता.
राज्यसभेतील धमाकेदार ‘एन्ट्री’
२००० साली रा.सू. गवई यांची राज्यसभेवर निवड झाली. राज्यसभेतील त्यांनी उचललेल्या पहिल्याच मुद्द्याने सभागृहाला हलवून सोडले. अरुण शौरी लिखित ‘वरशिपिंग फॉल्स गॉड’ या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याची खंत गवई यांच्या मनात होती. आपल्या भाषणाची सुरुवातच त्यांनी, ‘मी या ठरावाचा माझ्या दातांनी आणि नखांनी विरोध करतो’ असे करून सभागृह जिंकले. अरुण शौरी यांचे कुठेही नाव न घेता त्यांनी घणाघाती हल्ला केला. सत्ताधारी यावर हबकले व गोंधळामुळे सभागृह तहकूब करावे लागले. दुसऱ्या दिवशी रा.सू. गवई पुराव्यानिशी सभागृहात पोहोचले. त्यांना बोलण्याची परवानगी मिळत नसल्याचे दिसून येत असताना ते उभे झाले. ‘मला जर सिद्ध करण्याची परवानगी मिळणार नसेल तर माझा निषेध मी असा व्यक्त करतो,’ असे म्हणून त्यांनी पुस्तकाची पाने फाडून सभागृहात भिरकावली. कुठल्याही परिणामांची चिंता न करता त्यांनी उचललेल्या या धाडसी पावलाचे देशभरात कौतुक झाले. रा.सू. गवई हे आपले विचार सखोल अभ्यास करून निर्भीडपणे मांडतात ही छाप सभागृहावर पडली.
राज्यपालांचा वेळ जनतेसाठी काही करून दाखविण्यापेक्षा पदाची औपचारिकता निभावण्यातच जातो असा जनतेचा समज असतो. परंतु बिहारचे राज्यपाल असताना रा.सू. गवई यांनी हा समज दूर केला. शिक्षणातूनच प्रगतीचा मार्ग मिळतो हे चांगल्या पद्धतीने ठाऊक असलेल्या रा.सू. गवई यांनी बिहारमधील शिक्षणव्यवस्था रुळावर आणण्याचा संकल्प केला. दूरदृष्टी ठेवून त्यांनी नियोजन केले व नागपुरातील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा संपूर्णपणे कायापालट करणारे डॉ. कृष्णकुमार यांना त्यांनी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून बिहारमध्ये आणले. गवई यांनी केलेल्या कडक उपाययोजनांमुळे महाविद्यालयात न दिसणारा प्राध्यापकवर्ग नियमितपणे वर्गावर जाऊ लागला. जे प्राध्यापक अनुपस्थित राहतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा जाहीर इशाराच त्यांनी दिला होता. अभ्यासक्रम व सत्रदेखील नियमित करण्याचे निर्देश गवई यांनी विद्यापीठांना जारी केले.
राजकारणात कोणतेही पाठबळ नसताना रा.सू. गवई
यशस्वी झाले ते त्यांच्या दिलखुलास व मनमिळावू स्वभावामुळे. त्यांच्या या गुणामुळे त्यांनी सर्वपक्षीय मित्र जोडले होते. सर्वच पक्षांमध्ये त्यांचे हितचिंतक होते. गवर्इंची जवळीक काँग्रेस पक्षासोबत असली तरी जनसंघ, भाजपा, समाजवादी काँग्रेस यांसारख्या सर्वच पक्षांतील नेत्यांशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते. वसंतदादा पाटील, नासिकराव तिरपुडे, शंकरराव चव्हाण, बॅरिस्टर अंतुले, उत्तमराव पाटील, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन या विविध विचारांच्या नेत्यांशी त्यांची जवळीक होती. वैचारिक मतभेद बाजूला सारून ते दुसऱ्या पक्षातील नेत्यांजवळ जात. एका परदेश दौऱ्यादरम्यान अटलबिहारी वाजपेयी यांना थंडी वाजत होती, त्या वेळी रा.सू. गवई यांनी आपल्या अंगावरची शाल त्यांच्या खांद्यावर टाकली होती. गवई यांनी राजकारणात कधीही स्पृश्यास्पृश्यता मानली नाही.
बिहारमधील जैन-बौद्ध तीर्थस्थळांसाठी पुढाकार
बिहारचे राज्यपाल असताना रा.सू. गवई यांनी तेथील जैन व बौद्ध धर्माच्या तीर्थस्थळांच्या विकासासाठी मौलिक पुढाकार घेतला. २००६ साली लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा तसेच एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या नेतृत्वात नागपुरातून गेलेल्या ‘श्रीमती वीणादेवी आणि श्रीमती उषादेवी दर्डा कौटुंबिक तीर्थयात्रा श्रीसंघ’च्या सन्मानासाठी गवई यांच्या उपस्थितीत बिहारमधील राजभवनात कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी दर्डा यांनी बिहारमधील जैन तसेच बौद्ध धर्माच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा मुद्दा मांडला होता. शिवाय तेथे पोहोचण्यासाठी दळवळणाची व्यवस्था, विश्रामगृह इत्यादींकडेही गवई यांचे लक्ष वेधले होते. रा.सू. गवई यांनी याची गंभीर दखल घेतली व तीर्थस्थळांच्या विकासासाठी १३०० कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आल्याची घोषणा केली. त्यांनी जातीने लक्ष घातले व अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास केला हे विशेष.
मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा!
मराठवाडा विद्यापीठाला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी पुढे आली अन् नामांतरासाठी आंदोलन सुरू झाले. १९७७ साली हा मुद्दा उपस्थित झाला. विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांत हा प्रस्ताव मंजूर होऊनदेखील दंगलींमुळे भावनिक प्रश्न निर्माण झाला होता. या मुद्द्यावर राज्याचे राजकारण तापले होते. १९८२ साली गवई यांनी विधान परिषदेत चक्क बैठा सत्याग्रहच सुरू केला. त्यांनी सातत्याने मुद्दा लावून धरला व या नामांतरात त्यांचे योगदान राहिले.
जी व न प ट
नाव: रामकृष्ण गवई
वडिलांचे नाव : सूर्यभान गवई
मातोश्रीचे नाव : सरूबाई गवई
जन्मदिनांक : ३०/१०/१९२९
जन्मस्थळ : दारापूर, तालुका
दर्यापूर, अमरावती
विवाह : २९/११/१९५९
पत्नीचे नाव : कमलताई गवई
शिक्षण : पदवीधर
भूषविलेली पदे
सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद : १९६४ ते ६८, १९८२ ते ८५ आणि १९९० ते ९४ मध्ये. उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधान परिषद : १९६८ ते ७८. अध्यक्ष, महाराष्ट्र विधान परिषद : १९७८ ते ८२. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन, महाराष्ट्र शाखेचे संयुक्त अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषद : १२ डिसेंबर १९८६ ते डिसेंबर १९८८. सदस्य, बारावी लोकसभा : १९९८ ते ९९. राज्यसभेवर निवडून आले : एप्रिल २०००. राज्यपाल - बिहार : २२ जून २००६ ते १० जुलै २००८. राज्यपाल - केरळ : १० जुलै २००८ ते २५ आॅगस्ट २०११.
प्रकाशित ग्रंथ
अनुसूचित जाती आणि जमातीचे संदर्भात पंचवार्षिक योजना, अनुसूचित जाती आणि जमाती सर्व्हिसेस आणि प्रिव्हिलेजेस, आरक्षणविषयक जातीयुद्ध-जनता दरबारासमोर पेश, अनुसूचित जातीतून बौद्ध धर्म स्वीकारलेल्यांना सवलती, भारताने गौरविलेले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संदर्भात महाराष्ट्रातील जनतेसमोर कैफियत, सामाजिक व सांस्कृतिक चळवळी, साहित्य कला आणि शास्त्र या विषयातील कर्तृत्व व अन्य विशेष उपक्रम.
सन्मान
कुष्ठरोग्यांकरिता बहुमूल्य मदत व साह्य याबद्दल मिळालेले ‘कुष्ठमित्र अॅवॉर्ड’ आणि ‘कुष्ठरोग्यांचा मित्र अॅवॉर्ड’, प्रियदर्शनी ग्रुप, मुंबई यांच्यातर्फे ‘प्रियदर्शिनी अॅवॉर्ड : १९९०-१९९१’, नॅशनल प्रेस इंडिया नवी दिल्ली यांच्यातर्फे ‘नॅशनल प्रेस अॅवॉर्ड : १९९४’, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य मध्यवर्ती स्मारक उभे राहावे याकरिता घेतलेले परिश्रम याकरिता ‘ईश्वरी देवी अॅवॉर्ड-हैदराबाद १९९९’, मारवाडी फाउंडेशनचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार.
-----------------------------------------
एका मार्गदर्शकाला मुकलो
रा.सू. गवई यांच्या निधनाने एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व हरपले. दादासाहेबांच्या निधनामुळे आपण एका मार्गदर्शकाला मुकलो आहोत. माझे त्यांच्याशी वैयक्तिक संबंध होते. त्यांचा राजकीय, सामाजिक अशा सर्व स्तरातील लोकांशी दांडगा संपर्क होता. पक्षाच्या पलीकडे जाऊन विचार करणारे ते खऱ्या अर्थाने अजातशत्रू नेते होते. त्यांच्या जाण्यामुळे देशाचे, महाराष्ट्राचे तसेच आंबेडकरी चळवळीचे फार नुकसान झालेले आहे. मी त्यांना संपूर्ण राज्याच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान
महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीत गवई यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले असून, त्यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रातदेखील महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. दलित समाजाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीसोबतच राजकीय, सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
- सी. विद्यासागर राव, राज्यपाल
पुरोगामी नेतृत्व हरपले
पुरोगामी विचाराचे मोठे नेतृत्व हरपले, या जाणिवेने मनाला अत्यंत दु:ख झाले. गवई यांच्याशी माझा अनेक वर्षांपासून जवळचा स्नेह होता. महाराष्ट्र विधिमंडळात अनेक वर्षे आम्ही एकत्र होतो. त्याचप्रमाणे लोकसभेमध्येही ते माझे सहकारी होते. संसद व महाराष्ट्र विधिमंडळातील कारकिर्दीत त्यांनी पुरोगामी विचार व तळागाळातील जनतेचे प्रश्न हिरिरीने मांडले. गवई यांनी केरळ व बिहार राज्याच्या राज्यपाल पदाची जबाबदारीही उत्तमरीत्या पार पाडली.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी
देशाने एक मार्गदर्शक गमावला
वर्तमान परिस्थितीत त्यांच्यासारख्या पुरोगामी व धर्मनिरपेक्ष नेत्याच्या मार्गदर्शनाची नितांत गरज होती. त्यांच्या निधनामुळे प्रकर्षाने जाणवणारी एक पोकळी निर्माण झाली आहे.
- खा. अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
विदर्भाच्या चळवळीत आणि विदर्भाच्या विकासासाठी गवई साहेबांचे मोलाचे योगदान होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न त्यांनी खऱ्या अर्थाने दीक्षाभूमी स्मारक उभारून पूर्ण केले. बिहारमधील विद्यापीठाच्या प्रगतीसाठी मोठे कार्य केले.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
दादासाहेब हे शोषित, वंचितांच्या लढ्याचे मार्गदर्शक
दादासाहेब यांच्या निधनाने दलित बहुजन समाजाचे प्रश्न मांडताना कुठलीही तडजोड न करणारा एक ज्येष्ठ नेता आपण सर्वांनी गमावला आहे. भारतातील शोषित, वंचितांच्या लढ्याचे ते मार्गदर्शक होते. संसदीय राजकारणातील सर्व महत्त्वाच्या पदांवर काम करीत असताना वंचितांबद्दल असलेल्या कळवळ्याचा त्यांनी कधी विसर पडू दिला नाही. बिहारचे राज्यपाल असताना मी त्यांची बिहारमध्ये जाऊन भेट घेतली. त्या राज्यातील बौद्ध आणि जैन धर्मीयांच्या धार्मिक स्थळांच्या विकासाचा प्रश्न त्यांच्यासमोर ठेवल्यानंतर त्यांनी तातडीने बिहार सरकारला निर्देश दिले व कोट्यवधींचा
निधी या धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मंजूर झाला. ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वातंत्र्य संग्राम सेनानी आणि माझे पिताश्री जवाहरलाल दर्डा यांचे ते परमस्नेही होते. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा विषय असेल किंवा इतर सामाजिक चळवळी असतील हे सर्व विषय हातात घेत असताना दादासाहेबांचे लोकमतला सतत मार्गदर्शन लाभायचे. आज आम्ही एका ज्येष्ठ नेत्याला, आदर्श संसदपटूला आणि लोकमत परिवाराच्या मार्गदर्शकाला मुकलो आहोत.
- खा. विजय दर्डा, लोकमत एडिटोरियल बोर्ड चेअरमन