रा. सू. गवर्इंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By admin | Published: July 27, 2015 12:48 AM2015-07-27T00:48:47+5:302015-07-27T00:48:47+5:30
:रामकृष्ण उपाख्य दादासाहेब गवई यांच्या पार्थिवावर दर्यापूर तालुक्यातील दारापूर या त्यांच्या मूळ गावी सायंकाळी ६.२० वाजता शासकीय
दारापूर (जि.अमरावती) :रामकृष्ण उपाख्य दादासाहेब गवई यांच्या पार्थिवावर दर्यापूर तालुक्यातील दारापूर या त्यांच्या मूळ गावी सायंकाळी ६.२० वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्येष्ठ पुत्र न्यायमूर्ती भूषण आणि धाकटे पुत्र डॉ. राजेंद्र यांनी पार्थिवाला अग्नी दिला.
दादासाहेब गवई यांचे तिरंग्यात गुंडाळलेले पार्थिव डॉ. सौ. कमलताई गवई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणातील चौथऱ्यावर ठेवण्यात आले. अंत्यदर्शनासाठी लोटलेल्या जनसागराने येथे त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
तासाभरानंतर बौद्ध धर्मानुसार नागार्जुन सुरई ससाई, खेम धम्मो, चंद्रमणी, सुमेध बोधी या प्रमुख भतेंच्या मार्गदर्शनात दादासाहेबांच्या पार्थिवावर विधिवत सोपस्कार करण्यात आलेत. तीन फैरी झाडून दादासाहेबांना सलामी दिल्यावर भूषण आणि राजेंद्र यांनी पार्थिवाला अग्नि दिला.
दादासाहेबांच्या प्रगतीत हरघडी साथ देणाऱ्या त्यांच्या सहचारिणी कमलतार्इंचा आक्रोश हृदय पिळवटणारा होता. कन्या कीर्ती स्वत:ला सावरून आईलाही धीर देण्याचा प्रयत्न करीत होती.
सोनिया गांधींकडून शोकसंवेदना
नवी दिल्ली : रा.सू. गवई यांच्या निधनाबद्दल काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे. गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य पुढे चालू ठेवले. त्यांनी सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय अखंडतेसाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या निधनामुळे केवळ काँग्रेसचे नव्हे तर संपूर्ण देशाचे नुकसान झाले आहे, असे या दोन्ही नेत्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. गवई यांच्या कुटुंबीयांप्रति त्यांनी शोकसंवेदनाही व्यक्त केल्या आहेत.