पाण्याची सोय असेल तरच रबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:40 AM2018-10-15T11:40:38+5:302018-10-15T11:41:37+5:30
शेतीचा डॉक्टर : शेतकऱ्यांकडे दोन पाणी पाळी देण्यापुरती पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी हरभरा, ज्वारी, करडई, जवस यासारखी रबीतील पिकांची पेरणी करावी.
- प्रसाद आर्वीकर (परभणी)
परतीचा पाऊस आता पूर्णत: परतला आहे. हा पाऊस होण्याची शक्यता राहिली नाही. तेव्हा कोरडवाहू शेतकऱ्यांनी रबीच्या पेरण्या करू नयेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे दोन पाणी पाळी देण्यापुरती पाण्याची व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यांनी हरभरा, ज्वारी, करडई, जवस यासारखी रबीतील पिकांची पेरणी करावी, असा सल्ला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. यू.एन. आळसे यांनी दिला आहे.
राज्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आता पावसाचा भरवसा राहिला नसल्याने शेतकऱ्यांनी रबीची पेरणी करू नये. मात्र, पाण्याची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी संपूर्ण पीक शाश्वत पाणीसाठ्यावर घेता येत असेल, तर कमी पाणी लागणारे हरभरा, जवस, करडई, ज्वारी ही पिके घ्यावीत. गव्हासारख्या पिकाची पेरणी मात्र करू नये, असे आवाहन डॉ. आळसे यांनी केले आहे.
दरम्यान, खरीप हंगामातील मूग, उडीद या पिकांची काढणी झाली असून, सोयाबीनची काढणी सुरू आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे खळे करून घ्यावे. सोयाबीन काढणी झालेले रान मशागत करून ठेवावे. अनेक ठिकाणी सोयाबीनमध्ये तूर हे आंतरपीक घेतलेले असते. सोयाबीन काढणी झाल्यानंतर तुरीच्या पिकाला हलकी पाळी घालावी.
कापूस पिकासाठी शक्य आहे तेथे कोळपणी करून घ्यावी. बागायती शेतकऱ्यांनी कापसात एक ओळ सोडून सरीद्वारे पाणी द्यावे. खरिपातील कापूस आणि तूर ही पिके सध्या शेतात उभी आहेत. या पिकांना पाण्याचा ताण सहन करण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट किंवा १३:०:४५ किंवा युरिया, पोटॅशची प्रत्येकी १५० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, असे आवाहन डॉ. आळसे यांनी केले आहे.