राज्यात ५२ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी!
By admin | Published: November 21, 2015 01:39 AM2015-11-21T01:39:27+5:302015-11-21T02:18:03+5:30
५५ लाखांचे उद्दीष्ट आले निम्यावर; व-हाडात ४६ टक्के क्षेत्रावर पेरणी.
राजरत्न सिरसाट/अकोला : अल्प पावसाचा परिणाम यंदा खरीप पिकावर झाला असून, रब्बी हंगामातील पेरणीलाही झळ बसली आहे. परिणामी, राज्यात आतापर्यंत ५२ टक्के क्षेत्रावरच रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. विदर्भात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत शेतकरी विविध रब्बी पिके घेतात, पण जमिनीत ओलावा नसल्याने वर्हाडातील पाच जिल्हय़ांत केवळ ४६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पश्चिम विदर्भात यावर्षी सामान्यापेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांचे लक्ष रब्बी पिकांकडे लागले होते. परंतु परतीच्या पावसाने यावर्षी पाठ फिरवल्याने शेतजमिनीतील ओलावा संपला आहे. परिणामी रब्बी पिकांची पेरणी खोळंबली आहे. राज्यातील रब्बीचे क्षेत्र तसे ६२ लाख ४३ हजार हेक्टर आहे. त्यामध्ये रब्बी ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक ३0 लाख ९00 हेक्टर आहे. गहू ११७८६, मका ९९६, इतर रब्बी तृण धान्य ५४ हेक्टर, तर हरभरा १३ लाख ६८ हजार हेक्टर, इतर कडधान्य १२४३, करडई २११३, जवस ४९९, तीळ ३३ , सूर्यफूल १,६५५ हेक्टर आहे. दरम्यान, संरक्षित सिंचनाची उपलब्धता असलेल्या शेतकर्यांनी रब्बी ज्वारीसह हरभरा, मका आदी पिकांची पेरणी केली आहे. अनेक शेतकर्यांनी खरीप पिके घेतली नव्हती, त्या कोरड्या क्षेत्रावर ज्वारी, हरभरा पिकांची पेरणी झाली आहे. यावर्षी कृषी विभागाने रब्बी पेरणीचे उद्दिष्ट ६६ लाख २८ हजार हेक्टरने वाढवले आहे. यात अमरावती विभागासाठी जवळपास ९ लाख ५७ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु या तुलनेत यावर्षी राज्यात ५२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, पश्चिम विदर्भात ४६ टक्के क्षेत्रावरच पेरणी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी दुष्क ाळी स्थिती होती. त्यामुळे रब्बीची पेरणी कमी झाली होती. यावर्षीही जलयुक्त शिवाराची कामे झाली आहेत. तेथे रब्बीची स्थिती बरी असल्याचे सांगण्यात येत आहे.
**जलयुक्तचा लाभ
राज्यात यावर्षी जलयुक्त शिवाराची कामे झाल्याने शेतकर्यांना फायदा झाला. त्यामुळे यावर्षी याच भरवशावर कृषी विभागाने उद्दिष्ट वाढवले आहे. पश्चिम विदर्भात काही ठिकाणी चांगला फायदा झाला आहे.