शेतक-यांची भिस्त रब्बी पीक विम्यावर!

By admin | Published: November 21, 2015 01:41 AM2015-11-21T01:41:01+5:302015-11-21T01:41:01+5:30

बँकांच्या टोलवाटोलवीने शेतकरी त्रस्त.

Rabi Crop Insurance for Farmers! | शेतक-यांची भिस्त रब्बी पीक विम्यावर!

शेतक-यांची भिस्त रब्बी पीक विम्यावर!

Next

अकोला : पश्‍चिम विदर्भातील (वर्‍हाड) खरीप पिकांचे उत्पादन घटले असून, शेतकर्‍यांचे लक्ष रब्बी हंगामाकडे लागले आहे; परंतु रब्बी पेरणीवरही परिणाम होत असल्याने शेतकर्‍यांची भिस्त रब्बी पीक विम्यावर आहे. दुसरीकडे, ग्रामीण भागात पीक विमा काढण्यास बँका टाळाटाळ करीत असल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी वाढल्या आहेत. यावर्षी पावसाने दडी मारल्याने पश्‍चिम विदर्भातील खरीप पिकावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. मूग, उडीद व सोयाबीन पिके हातची गेली असून, कापसाचा अपेक्षित उतारा येत नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. त्यासाठीच शेतकर्‍यांना रब्बी हंगामाकडून मोठी अपेक्षा होती. परंतु यावर्षी मुख्यत्वे वर्‍हाडातील चित्र वाईट आहे. रब्बीसाठी शेतात ओलावा नाही, याही परिस्थितीत शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. सोयाबीनच्या शेतात हरभरा पिकाची पेरणी शेतकर्‍यांनी केली; तथापि शेतात ओलावा नसल्याने हरभरा तुरळक स्वरू पात उगवला, तर अनेक ठिकाणी पेरलेला हरभरा आलाच नाही. मुगाच्या शेतात हरभरा येतो, पण मुगाच्या शेतातही हरभरा उगवला नाही. गहू पेरणीची ही वेळ आहे; तथापि गव्हाची पेरणीदेखील लांबली आहे. त्यामुळे शेतकरी सैरभैर झाला असून, पीक विमा काढण्यासाठी भटकत आहे. कृषी विभागाने पीक विम्यासाठी बँकांच्या मुख्य शाखांना पत्र दिले आहे. परंतु मुख्य शाखेकडून अद्याप हे पत्र त्यांच्या शाखांना पोहोचले नसल्याचे सांगण्यात येत असल्याने राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमध्ये शेतकर्‍यांच्या वार्‍या सुरू आहेत. दरम्यान, गतवर्षी या विभागातील ३९,७२७ शेतकर्‍यांनी रब्बीचा पीक विमा काढला होता. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ६ हजार ९८७ शेतकर्‍यांनी ६ लाख ३७ हजार रुपये विमा हप्ता भरला आहे. वाशिम जिल्हय़ातील १ हजार २५३ शेतकर्‍यांनी १ लाख ५६ हजार रुपये भरू न पीक विमा काढला आहे. अकोला जिल्हय़ातील २५ हजार ७८३ शेतकर्‍यांनी ८३ लाख २१ हजार रुपयांचा विमा काढला आहे. अमरावती जिल्हय़ातील ३ हजार १९९ शेतकर्‍यांनी १५ लाख ९९ हजार रुपयांचा पीक विमा काढला असून, यवतमाळ जिल्हय़ातील २ हजार ५९४ शेतकर्‍यांनी ३ लाख ७४ हजार रुपये हप्ता भरू न पीक विमा काढला आहे. या शेतकर्‍यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे.

Web Title: Rabi Crop Insurance for Farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.