रवींद्र वायकरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा- संजय निरुपम
By admin | Published: June 23, 2016 09:22 PM2016-06-23T21:22:59+5:302016-06-23T21:31:10+5:30
शिवसेना आमदार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत आरे कॉलनीतील २० एकर जमीन ताब्यात घेतली
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - शिवसेना आमदार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत आरे कॉलनीतील २० एकर जमीन ताब्यात घेतली असून व्यायामशाळेच्या नावाखाली अनधिकृत बांधकाम केले आहे. त्यामुळे वायकर यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी आणि आरे कॉलनीतून अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
रवींद्र वायकर यांना आदिवासींसाठी व्यायामशाळा काढण्यासाठी ३५० मीटर जागा मंजूर झाली असताना त्यांनी लगतच्या २० एकर जमिनीवर अनधिकृत ताबा मिळविला आहे. तसेच व्यायामसाळेवर अनधिकृतपणे पहिला मजला चढविला आहे. आरे प्रशासनाने याबाबत वारंवार म्हाडाशी पत्रव्यवहार करुन कारवाईची मागणी केली आहे. मात्र, म्हाडाचा कारभारच वायकरांकडे असल्याने कारवाई होत नाही.
वायकर यांनी या आरोपांबाबत खुलासा करताना व्यायामशाळेसाठी ४ गुंठे जागा मंजूर झाला असून त्यानुसारच बांधकाम करण्यात आला आहे. शिवाय शिवसमर्थ शिक्षण प्रसारक संस्था नोंदणीकृत असल्याचा दावा केला आहे. मात्र, सदर संस्थेची नोंदणी झाली नसल्याची माहिती धर्मदाय आयुक्तांच्या कार्यालयाने दिली आहे. त्यामुळे या संस्थेच्या नोंदणीचे पुरावेच वायकरांनीच जाहिर करावेत. आरे ने ८ मार्च २०१५ रोजी म्हाडाला पत्र लिहिले होते. यात व्यायामशाळेवर अनधिकृतपणे एका मजल्याचे बांधकाम करण्यात आले असून त्यावर त्वरित कारवाई करण्यास सांगण्यात आले होते. परंतु वायकर यांनी मंत्री पदाचा दुरुपयोग करून त्या अनधिकृत बांधकामावर आजपर्यंत कारवाई केली नाही. आरेच्या पत्रावर वायकर गप्प का ? अनधिकृत बांधकाम का पाडले गेले नाही, याचा खुलासाही वायकर यांनी करावा, असे आव्हान निरुपम यांनी दिले.