बनावट प्रमाणपत्राचे रॅकेट उघडकीस

By admin | Published: September 21, 2016 03:07 AM2016-09-21T03:07:02+5:302016-09-21T03:07:02+5:30

मृत्यूच्या दाखल्यापासून ते पदवी, पदव्युत्तर आदी प्रमाणपत्रांची विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले आहे.

Racket of fake credentials opened | बनावट प्रमाणपत्राचे रॅकेट उघडकीस

बनावट प्रमाणपत्राचे रॅकेट उघडकीस

Next


नवी मुंबई : मृत्यूच्या दाखल्यापासून ते पदवी, पदव्युत्तर आदी प्रमाणपत्रांची विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. त्यामध्ये एका आरटीओच्या दलालाचाही समावेश असल्याने या बनावट प्रमाणपत्रांचा वापर रिक्षाचे परमिट मिळवण्यासाठी झाला असल्याची दाट शक्यता आहे. तर काहींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ठिकठिकाणी नोकऱ्या देखील मिळविल्या असून अशा २५५ जणांची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नुकतीच कोपरखैरणेतील सायबर कॅफेवर छापा टाकून बनावट कागदपत्रे बनवणारे रॅकेट उघडकीस आणले आहे. त्यामध्ये एका आरटीओ एजंटचा तसेच महा ई - सेवा केंद्र चालकाचा समावेश आहे. कोपरखैरणे सेक्टर ८ येथील येथील जी टेक सायबर कॅफेत बनावट प्रमाणपत्र विकणारे रॅकेट सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनला मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त दिलीप सावंत, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार पिंजण यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी सायबर कॅफे चालक दीपक सुर्वेच्या अधिक चौकशीत रतन दरवे, जयप्रकाश गीते, जॉन नाडर, दीपक तनपुरे, भरत तांबे, आशिष पेडणेकर यांना अटक करण्यात आली. रतन हा शासनाच्या महा ई - सेवा केंद्राचा चालक असून गीते हा आरटीओचा एजंट आहे. त्यांना पेडणेकर प्रमाणपत्रे व दाखले छापून द्यायचा. त्यांनी उर्वरित तिघांसह अनेकांना दहावी पास, शाळा सोडल्याचा दाखल्यासह अनेक प्रकारची बनावट प्रमाणपत्रे व दाखले बनवून दिलेले आहेत. पोलिसांनी सायबर कॅफे व पेडणेकरच्या खारघर येथील घरावर टाकलेल्या छाप्यात विविध प्रकारची ६७३ बनावट प्रमाणपत्रे आढळल्याचे उपआयुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले. तपासात २५५ जणांची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून त्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचे उघड झाले आहे. वाशीत झेरॉक्सचा व्यवसाय करणाऱ्या भरत तांबेकडे बनावट कागदपत्राची मागणी करणारे नागरिक संपर्क साधायचे. यावरुन त्याने पेडणेकर व सुर्वे यांच्याशी संगमनत करुन त्यांनी हे रॅकेट सुरु केले होते. बनावट जातीचे व शाळा सोडल्याचे बनावट दाखले यासह दहावी, बारावी पास झाल्याची बनावट प्रमाणपत्रे देखील बनवून दिलेली असून त्याचा वापर करुन अनेकांनी रिक्षाचे परमिट देखील मिळवल्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)
>या टोळीकडून ५४ शाळा, महाविद्यालयांचे बनावट स्टँप आढळले आहेत. मुंबई विद्यापीठ, टिळक विद्यापीठ, रामराव आदिक इन्स्टिट्यूट, बेडेकर कॉलेज, कीर्ती कॉलेज, ह्युम हायस्कूल, झुनझुनवाला कॉलेज, भवन्स कॉलेज, शेतकरी शिक्षण संस्थेचे घणसोली विद्यालय, सेंट लॉरेन्स यांची बनावट प्रमाणपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत.

Web Title: Racket of fake credentials opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.