‘मणप्पुरम गोल्ड’वर दरोडा
By admin | Published: September 29, 2016 12:57 AM2016-09-29T00:57:10+5:302016-09-29T00:57:10+5:30
उत्तर नागपुरातील जरीपटका परिसरात मणप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर सहा जणांनी दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकून ३१ किलो ७४१ ग्राम सोन्याचे दागिने लुटून नेले.
नागपूर : उत्तर नागपुरातील जरीपटका परिसरात मणप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर सहा जणांनी दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा टाकून ३१ किलो ७४१ ग्राम सोन्याचे दागिने लुटून नेले. या घटनेमुळे पोलीसही हादरले आहेत. दरोडेखोरांच्या शोधार्थ उपराजधानीत सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे.
जरीपटका मुख्य मार्गावरील भीम चौकात कुकरेजा कॉम्प्लेक्स आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मणप्पुरम गोल्डचे कार्यालय आहे. बुधवारी दुपारी ४.१५च्या सुमारास कार्यालयात तीन कर्मचारी व सहा ग्राहक होते. त्यावेळी सहा जण आत शिरले व त्यापैकी
चार जणांनी आपल्याकडील पिस्तुल काढून सर्वांना धमकावले.
त्यानंतर लॉकर रुममध्ये जाऊन त्यांनी लॉकरमधून ३१ किलो ७४१ ग्राम सोन्याचे दागिने आणि ३ लाख रुपये लुटले. या दागिन्याची एकूण किंमत ५ कोटी ६० लाख रुपये असल्याचे
सांगितले जाते.
त्यानंतर लॉकर रूममधून ग्राहक व कर्मचाऱ्यांना कोंडून तसेच त्याआधी सर्वांकडून मोबाईल हिसकावून ते पसार झाले. हा प्रकार जवळपास २५ मिनिटे सुरू होता. यादरम्यान कर्मचाऱ्यांनी लॉकरची तार कापून सायरन वाजविला.
या कार्यालयात बऱ्याचदा अकारण सायरन वाजला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या आवाजाकडे दुर्लक्ष केले. त्याचवेळी एक ग्राहक दागिने सोडविण्यासाठी तेथे पोहोचला. त्याने दार उघडून सर्वांची सुटका केली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)