भ्रूणहत्येसाठी औषधे विकणाऱ्यांचे रॅकेट
By admin | Published: May 19, 2016 01:43 AM2016-05-19T01:43:57+5:302016-05-19T01:43:57+5:30
कोणताहा परवाना नसताना भू्रणहत्येसाठीची औषधे विकणाऱ्यास अन्न व औषध प्रशासनाने सापळा रचून पकडले़
पुणे : कोणताहा परवाना नसताना भू्रणहत्येसाठीची औषधे विकणाऱ्यास अन्न व औषध प्रशासनाने सापळा रचून पकडले़ श्रीपाल अमृतलाल जैन (वय ३४, रा़ महावीर सोसायटी, लडकत पेट्रोल पंपाजवळ, भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे़ खडक पोलिसांनी त्याला अटक केली असून तपासासाठी न्यायालयाने ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त (औषधे) एस़ टी़ पाटील यांनी सांगितले, की स्त्रीभ्रूणहत्येबाबत औषधावर केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत गर्भपात केंद्रावर वापरली जाणारी अधिकृत औषधे ही बेकायदेशीरपणे राजस्थानी बोलणारा एक जण विकत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानंतर एका राजस्थानी बोलणाऱ्याच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधला व १० किटची मागणी नोंदविली़ त्यानंतर मंगळवारी संपर्क साधला असता त्याने आपण आता मुंबईत असल्याचे सांगितले़ तेव्हा आजच औषधे पाहिजेत, आपल्या पत्नीचा गर्भपात करायचा असल्याचे या मध्यस्थाने सांगितले़ त्या वेळी त्याने तुम्ही पीएमपी बसस्टॉपवर थांबा मी माणूस पाठवितो, असे सांगितले़ त्याप्रमाणे भवानी पेठ परिसरात सापळा रचला़ श्रीपाल जैन हे औषधे घेऊन आले़ त्यांनी औषधे देऊन पैसे घेताच छापा घालून त्यांना पकडण्यात आले़
याप्रकरणी औषध निरीक्षक शामल महिंद्रकर यांनी फिर्याद दिली आहे़ जैन यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले़ स्त्रीरोगतज्ज्ञाच्या देखरेखीखाली व त्यांच्या शिफारशीने वापरल्या जाणाऱ्या औषधांची विक्री कोणत्याही परवान्याविना करून कायद्याचा भंग केला आहे़ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कॉम्बीपॅक आॅफ मिफ्रीस्टोन अँड मिसोप्रोस्टोल टॅबलेटस, गेस्टाप्रो या औषधांची विक्री केली़ ही औषधे फक्त शासनाच्या अधिकृत गर्भपात केंद्रावर मिळत असताना त्यांच्याकडे कोठून आली़ त्याच्या साथीदारांची माहिती घेऊन त्यांना अटक करायची आहे़ याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील संध्या काळे यांनी कोठडीची मागणी केली़ न्यायालयाने ती मंजूर केली़