नाशिकमध्ये रॅकेट : बाहेरगावातील गुंतवणूकदारांच्या मिळकतींवर होतोय कब्जा!

By admin | Published: April 15, 2017 07:25 AM2017-04-15T07:25:00+5:302017-04-15T07:25:00+5:30

जमिनीचे मालक म्हणून तुमच्याऐवजी भलत्याच कोणाला उभे करून प्रॉपटी परस्पर विकली जाऊ शकते, नाशिकमध्ये गेल्या सव्वा वर्षातच अशाप्रकारचे तब्बल दहा गुन्हे नोंदविले गेले आहेत.

Racquet in Nashik: Capture the occupation of investors in the outskirts! | नाशिकमध्ये रॅकेट : बाहेरगावातील गुंतवणूकदारांच्या मिळकतींवर होतोय कब्जा!

नाशिकमध्ये रॅकेट : बाहेरगावातील गुंतवणूकदारांच्या मिळकतींवर होतोय कब्जा!

Next
>ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, पुण्यातील मिळकतदारांनो सावधान
 
नाशिक, दि. 15 - सुवर्ण त्रिकोणातील शहर म्हणून मुंबई पुण्याच्या बहुतांशी गुंतवणूकदारांनी नाशिकमध्ये जमिनीत गुंतवणूक केली आहे. परंतु केवळ गुंतवणूक करून विषय सोडून दिला असेल तर सावध राहा. जमिनीचे मालक म्हणून तुमच्याऐवजी भलत्याच कोणाला उभे करून प्रॉपटी परस्पर विकली जाऊ शकते. नाशिकमध्ये गेल्या सव्वा वर्षातच अशाप्रकारचे तब्बल दहा गुन्हे नोंदविले गेले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये जमिनीत गुंतवणूक केल्यानंतर त्याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. 
 
नाशिकची हवा पाणी चांगले असल्याने मुंबई आणि पुण्याचे गुंतवणूकदार जमिनीमध्ये गुंतवणूक करतात. दोन पाच वर्षांत जमिनींचे दर वाढतात आणि फायदाही मिळतो. किंवा कित्येकदा निवृत्तीनंतरचे आयुष्य नाशिकमध्ये व्यतीत करण्यासाठीही भूखंड घेऊन ठेवला जातो. परंतु गुंतवणूक वा भविष्याची तरतूद म्हणून खरेदी केलेल्या मिळकतीची खातरजमा करण्यासाठी आल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघडकीस येते व संबंधित मालकाच्या पायाखालची वाळूच सरकते़ गेल्या काही वर्षांपासून या घटना सातत्याने घडत आहेत. संबंधित जमिनीवर केवळ अतिक्रमण करण्याइतपत हा विषय समीत नाही तर संपूर्ण जमीन कायदेशीरदृष्ट्या सर्व व्यवहार करून विकली जाते. अर्थातच, त्यासाठी बोगस जमीनमालक, साक्षीदार उभे केले जातात. त्यांचे निवास किंवा अन्य पुरावे म्हणून चक्क आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड तयार केले जातात आणि त्याच्या आधारे खऱ्या दुय्यम निबंधकांसमोर खोटे जमीनमालक उभे करून दस्त नोंदणीही केली जाते. यंत्रणेला याचा संशय येत नाही ही आश्चर्याची बाब असली तरी मुळात प्रश्न खऱ्या जमीनमालकांचा आहे. आपल्या जमिनीची चौकशी केल्यानंतर ही जमीन परस्पर विकली गेल्याचे स्पष्ट होते आणि त्याला लाखो, कोट्यवधी रुपयांचा भूखंड मिळविण्यासाठी न्यायालयात खेटे घालून स्वत:च खरे असल्याचे सिद्ध करण्यात आयुष्य जाते. 
 
गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये अशाप्रकारच्या फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असले तरी गेल्या एक ते दीड वर्षात त्यात वाढ झाली असून, लोकमतने मिळविलेल्या माहितीनुसार सव्वा वर्षात दहा गुन्हे दाखल झाले आहेत. 
 
नाशिकमधील जमिनीचे फसवणुकीचे अलीकडेच प्रातिनिधिक उदाहरण द्यायचे झाल्यास नुकतेच मुंबईतील सानपाडा परिसरात राहणाऱ्या पुष्पावती माधव नाकील यांच्या मिळकतीबाबत देता येईल. ३१ मे १९८२ रोजी गोविंद म्हसलकर यांच्याकडून नाशिक महापालिका हद्दीतील मौजे गंगापूरगाव शिवारातील सर्व्हे नंबर १२७ मधील १८ नंबरचा बिनशेती प्लॉट (२८०१ चौरसमीटर) त्यांनी खरेदी केला़ या प्लॉटची दुय्यम निबंधकांकडे नोंदणी करून सातबारा उताऱ्यावर नावही लावले़ मात्र, पतीच्या निधनानंतर त्या मुलीकडे मुंबईला राहण्यासाठी गेल्या.
 
१९ जानेवारी २०१७ रोजी एका स्थानिक वर्तमानपत्रात संशयित रतन फकिरराव घोडके व गणेश लक्ष्मण मेहेत्रे यांनी संगमनमत करून नाकील यांच्या नावाचे बोगस पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र तयार करून त्यांच्याऐवजी दुसरीच महिला दुय्यम निबंधकांसमोर उभी करून या जागेची विसारपावती केली़ तसेच या मिळकतीचा व्यवहार पूर्ण करावयाचा असल्याने कुणाची काही हरकत असल्यास संबंधित वकिलांशी संपर्क करण्याची नोटीसही प्रसिद्धीस दिली. स्थानिक वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध करण्यात आल्याने त्यांना ती मुंबईला बघण्यासाठी वा वाचण्यास मिळण्याची शक्यता नाही़; मात्र त्यांच्या प्लॉटशेजारील एका व्यक्तीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी नाकील यांना कळविले. त्यामुळे त्यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ नाशिकमध्ये येऊन वकिलामार्फत नोटिसीस उत्तर दिले व संशयितांविरुद्ध पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. 
 
गुजराती गुंतवणूकदाराला गंडा
केवळ मुंबई पुणेच नव्हे तर अन्य राज्यातील गुंतवणूकदार सुरक्षित नाही. गुजरातमधील अमदाबाद येथे राहणाऱ्या जयश्री अजय गुप्ता यांनी नाशिक शहरातील देवळाली येथील योगेश्वर अपार्टमेंट या इमारतीत नऊ नंबरचा फ्लॅट होता़ या बंद फ्लॅटमध्ये दोन महिलांनी बळजबरी घुसून तो मूळ मालकाशी करार करून भाडेतत्त्वावर घेतल्याचे दाखविले; मात्र प्रत्यक्षात मूळ मालकासोबत कुठलाही करार झालेला नव्हता़ अखेर हा प्रकार मूळ मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली खरी, मात्र स्वत:च खरेदी केलेला फ्लॅट घरात घुसलेल्या महिलेकडून परत मिळविण्यासाठी न्यायालय, पोलीस अशा चकरा माराव्या लागल्या़
 
स्थानिकांचाही बळी
केवळ बाहेरील गुंतवणूकदार नाही तर नाशिकमधील स्थानिक मिळकतदारांना भूखंड, बंगले आणि सदनिकांवरही भूमाफियांनी वक्रदृष्टी दाखविली आहे. पन्नास टक्के गुन्हे स्थानिक मिळकतींसंदर्भात दाखल आहेत. यात एका प्रकरणात तर एका व्यक्तीने जुना बंगला खरेदी केला आणि दुसऱ्या दिवशी त्याचे पाडकाम करून नवीन बंगला बांधण्याचे ठरविले असताना आदल्याच दिवशी एकाने तो बंगला बळकावला. हे प्रकरण दोन वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे. जमीनमालक घरासंदर्भात सर्व कर भरीत आहे, आणि बंगला बळकवणारा फुकटात मजा घेत आहे. 
 
रिकाम्या मिळकतींवर बारीक नजर
शहरातील पडून असलेल्या बाहेरगावच्या गुंतवणूकदारांच्या मिळकतीवर या रॅकेटचे बारीक लक्ष असते़ या मिळकतीचे गुंतवणूकदार कुठे असतात? नाशिकला येतात का? याबाबत सखोल चौकशी केली जाते. गुंतवणूकदार मुंबई-पुणे किंवा अन्य ठिकाणचा रहिवासी असेल त्याला सहजासहजी येथील व्यवहार कळत नाही. त्यामुळे असा सर्व्हे केल्यानंतर सरकारी यंत्रणेस हाताशी धरून मूळ कागदपत्रांच्या छायांकित प्रती मिळवून बनावट कागदपत्रे तयार केली जातात़ या कागदपत्रांवरून बनावट विसारपावती, बनावट खरेदीखत तयार केले जाते़ यानंतर या मिळकतीचा व्यवहार केला गेल्याची अनेक उदाहरणे आहेत़ विशेष म्हणजे व्यवहारातील कायद्याची औपचारिकता म्हणून स्थानिक वृत्तपत्रात हरकती घेण्याबाबत जाहिराती दिल्या जातात. परंतु जागा मालकच येथे उपस्थित नसल्याने त्याला आपल्या मिळकतीच्या विक्रीच्या परस्पर हालचाली सुरू असतील याची पुसटशी कल्पनाही नसते. 
 
प्रॉपर्टी बळकावणाऱ्या आणि त्याचा परस्पर व्यवहार करणाऱ्या या रॅकेटमधील माणसे इतकी मुरलेली असतात की मिळकत मालकाचे बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच निवडणूक ओळखपत्रही तयार करतात़ मूळ मालकासारखीच सही व मालकाऐवजी भलतीच व्यक्ती उभी करून दुय्यम निबंधकांचीही फसवणूक केली जाते़ तर काही प्रकरणांमध्ये बनावट मृत्युपत्र तयार करून ते नोटरी करून त्याद्वारे व्यवहार केल्याचेही समोर आले आहे़

Web Title: Racquet in Nashik: Capture the occupation of investors in the outskirts!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.