काँग्रेसमध्ये राडा, १५ ते २० जागांवर डबल ए-बी फॉर्म
By admin | Published: February 3, 2017 10:03 PM2017-02-03T22:03:33+5:302017-02-03T22:03:33+5:30
तीन दिवस मुंबईत तळ ठोकून बसल्यानंतरही नेत्यांना मर्जीतील सर्वांनाच तिकीट मिळवून देण्यात यश आले नाही.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 3 - आपल्या समर्थकांना तिकीट मिळवून देण्यासाठी तीन दिवस मुंबईत तळ ठोकून बसल्यानंतरही नेत्यांना मर्जीतील सर्वांनाच तिकीट मिळवून देण्यात यश आले नाही. काँग्रेसच्या तिकीट वाटपाचा गोंधळ या वेळी कायम राहिला. सुमारे १८ ते २० जागांवर डबल ए-बी फॉर्म वितरित करण्यात आले. तिकीट कटल्यांनी समर्थकांसह काँग्रेस नेत्यांविरोधात रोष व्यक्त केला. उत्तर नागपुरात अभिजित वंजारी यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली.
विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, गुड्डू तिवारी, रेखा बाराहाते, उज्ज्वला बनकर, तानाजी वनवे, हर्षला साबळे आदींनी पुन्हा तिकीट मिळाले. युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके व महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक यांनाही उमेदवारी मिळाली आहे. दिग्गज नगरसेवकांना धक्काही बसला आहे. नगरसेवक दीपक कापसे, किशोर डोरले, अरुण डवरे, देवा उसरे, नयना झाडे, शीला मोहोड, विद्या लोणारे, कुमोदिनी कैकाडे, अशरफुनिसा अंसारी या नगरसेवकांचे तिकीट कटले. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या शीतल घरत, अपक्ष नगरसेवक किशोर डोरले व मनसेतून आलेले श्रावण खापेकर यांनाही उमेदवारी मिळू शकली नाही.
माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे कट्टर समर्थक असलेले दीपक कापसे यांचे तिकीट कटले. नगरसेवक अरुण डवरे यांना प्रभाग १० व ११ पैकी एकाही प्रभागातून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी दोन्ही प्रभागात अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. प्रभाग ३२ मध्ये काँग्रेसच्या नगरसेविका नयना झाडे यांचे तिकीट कटले. त्यांच्या जागी नम्रता देशमुख यांना संधी देण्यात आली आहे. नाराज झालेल्या झाडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला असून, निवडणूक लढण्यासाठी लोकांचा आग्रह असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षश्रेष्ठींनी तिकीट कापून अन्याय केला. नेत्यांनी पुत्रप्रेमासाठी माझे तिकीट कापले, असा आरोप त्यांनी केला. १८ ते २० जागांवर डबल ए-बी फॉर्म वितरित करण्यात आले. नितीन राऊत यांच्या उमेदवारांनी प्रारंभी ए-बी फॉर्म घेण्यास नकार दिला. त्यामुळे दुसऱ्या उमेदवारांना वेळेवर ए-बी फॉर्म देण्यात आल्याची माहिती आहे. याशिवाय यादीत एक नाव असताना काही जागांवर दुसऱ्याच उमेदवाराला ए-बी फॉर्म दिल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अर्जांच्या छाननीनंतरच अधिकृत उमेदवार कोण हे स्पष्ट होईल. याबाबत विचारणा केली असता शहर अध्यक्ष विकास ठाकरे म्हणाले, प्रभागात चार उमेदवारांना एकत्र लढायचे आहे. वेळेवर एखाद्या उमेदवाराने माघार घेतली किंवा त्रुटीमुळे अर्ज रद्द झाला तर जागा रिकामी जाऊ नये म्हणून प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार काही जागांवर दोन नंबर टाकून ए-बी- फॉर्म देण्यात आले आहेत. पहिला अर्ज कायम राहिला तर दुसरा अर्ज आपोआप रद्द होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.