वरळी मतदारसंघावरून ठाकरे-शिंदे गटात राडा; आदित्य यांच्या आव्हानावर शिंदे गटाची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 11:37 AM2023-02-05T11:37:53+5:302023-02-05T11:40:59+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक आणि कार्यकर्ते गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. विशेषत: वरळीतील आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघावर शिंदे गटाकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे आव्हान दिले. या आव्हानावरून आता ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये जोरदार जुंपली आहे. वरळीची जागा आम्ही जिंकणार असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे; तर मुख्यमंत्र्यांनी ३२ वर्षांच्या तरुणाचे आव्हान स्वीकारावे, अशी टिप्पणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक आणि कार्यकर्ते गळाला लावण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. विशेषत: वरळीतील आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघावर शिंदे गटाकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या विश्वासातील माजी नगरसेवकही शिंदे गटाकडून गळाला लावण्यात आला. यामुळे अस्वस्थ असलेल्या आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच वरळीतून लढण्याचे आव्हान दिले. या आव्हानावर उत्तर देण्यासाठी शिंदे गटातील नेतेही सरसावले. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी स्वत:च ठाकरेंविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. पराभव व्हावा अशी इच्छा असेल तर एकनाथ शिंदे यांना तुमच्याविरोधात लढण्याची गरज नाही.
आम्ही तुमच्याविरोधात लढायला तयार आहोत, असे त्या म्हणाल्या. याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री हे क्रांतिकारी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ३२ वर्षांच्या तरुणाने दिलेले आव्हान स्वीकारावे. राजीनामा देऊन आदित्य ठाकरे यांच्यासमोर निवडणूक लढायला पाहिजे, असा टोला लगावला.
आदित्य ठाकरे यांनी आव्हान देत बसण्यापेक्षा आधी स्वत:च्या मतदारसंघात फिरले पाहिजे. विधानसभा निवडणुकीसाठी ते ज्यावेळी उभे राहतील, त्यावेळी आम्ही सक्षम उमेदवार त्यांच्याविरुद्ध उभा
करू आणि वरळीची जागा निश्चितच जिंकू.
- दीपक केसरकर, प्रवक्ते