शिवसेना-विदर्भवाद्यांमध्ये राडा, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 06:12 AM2018-05-01T06:12:51+5:302018-05-01T06:12:51+5:30

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर आयोजित चर्चासत्रात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गोंधळ घातला.

Rada in Shiv Sena-Vidarbhaas, on the eve of Maharashtra Day | शिवसेना-विदर्भवाद्यांमध्ये राडा, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वाद

शिवसेना-विदर्भवाद्यांमध्ये राडा, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वाद

googlenewsNext

नागपूर : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर आयोजित चर्चासत्रात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत गोंधळ घातला. शिवसेनेचे कार्यकर्ते संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देत असताना विदर्भवाद्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे वातावरण तापले व हमरीतुमरीपर्यंत वेळ आली. तापलेले वातावरण लक्षात घेता राज्याचे माजी महाधिवक्ता व ज्येष्ठ विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.
ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांनी लिहिलेल्या ‘महाराष्ट्र मॅक्सिमस : द स्टेट, इट्स सोसायटी अ‍ॅन्ड पॉलिटिक्स’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नागपूर प्रेस क्लबमध्ये आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
यात शिवसेना खा. आनंद अडसूळ, अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस व माजी खासदार अविनाश पांडे, माजी खासदार विजय दर्डा, अ‍ॅड. श्रीहरी अणे,
‘वनराई’चे विश्वस्त गिरीश गांधी, साहित्यिक वि. स.जोग हे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच वेगळ्या विदर्भाची चर्चा कल्पनाविलास आहे का, या मुद्यावर अ‍ॅड.अणे यांचे मत विचारण्यात आले. अ‍ॅड. अणे यांनी याचे उत्तर तर येथे उपस्थित विदर्भवादीच आपले हात वर करून देतील, असे म्हटले.
यावर सभागृहात उपस्थित शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सर्व कार्यकर्ते अ‍ॅड. अणे यांच्यासमोर एकत्र झाले व संयुक्त महाराष्ट्राच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करायला लागले.
यावेळी विदर्भवादी कार्यकर्ते अणे यांच्या समर्थनार्थ समोर आले. दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरश: धक्काबुक्कीदेखील सुरू झाली. सातत्याने २ ते ३ वेळा असा प्रकार झाला. अखेर खा. आनंद अडसूळ हे आपली भूमिका मांडायला उभे झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते शांत झाले.

विदर्भवाद्यांवर अडसूळ यांची टीका
खा. अडसूळ यांनी विदर्भवाद्यांवर टीका केली. हा चर्चासत्राचा कार्यक्रम होता. मात्र अ‍ॅड. अणे यांनी जाणुनबुजून वेगळ्या विदर्भाच्या बाजूने लोक आहेत, असे म्हणून वादाला सुरुवात केली. चर्चासत्रादरम्यान दुसऱ्या बाजूची मते ऐकण्याची त्यांची मानसिकताच नाही. मोजक्या लोकांच्या भावनांना ते सर्व जनतेच्या भावना कशा सांगतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
अणेंचा सवाल, राज्यात कशाला राहायचे ?
यासंदर्भात अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क केला असता
मत मांडू न देण्यासाठीच हा गोंधळ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही वेगळ्या विदर्भाबाबत मत मांडले की लोकांना त्रास होतो. अशा राज्यामध्ये राहण्याचा अर्थ काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा गोंधळ नियोजित होता व अमरावतीहून भाडोत्री माणसे बोलविण्यात आली होती, असा
आरोप त्यांनी केला.

Web Title: Rada in Shiv Sena-Vidarbhaas, on the eve of Maharashtra Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.