मतमोजणीवेळी राडा
By admin | Published: February 24, 2017 05:23 AM2017-02-24T05:23:13+5:302017-02-24T05:23:13+5:30
मुलुंड, भांडुप, घाटकोपर आणि चेंबूर परिसरात पराजयी झालेल्या उमेदवारांनी विजयी उमेदवारांवर संशय
मुंबई : मुलुंड, भांडुप, घाटकोपर आणि चेंबूर परिसरात पराजयी झालेल्या उमेदवारांनी विजयी उमेदवारांवर संशय व्यक्त करत, गोंधळ घातल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये चेंबूर परिसरात तब्बल तीन तास मतमोजणी बंद करण्यात आली होती. अखेर चेंबूर पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेत परिस्थितीवर नियंत्रण आणले.
पालिकेच्या एम पश्चिम वॉर्डातील प्रभाग क्रमांक १५०मधील उमेदवारांनी ऐन मतमोजणीदरम्यान राडा केल्याने प्रक्रियेत अडथळा आला. या वॉर्डात माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नीला काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती. यापूर्वीदेखील त्या या प्रभागामधून विजयी झाल्या होत्या. मात्र, गुरुवारी कलेक्टर कॉलनी येथे झालेल्या मतमोजणीच्या वेळी त्यांच्या विरोधात उभे असलेले इतर उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातला. पहिल्या फेरीत एकूण ८७०मधील ६५७ मते ही काँग्रेसलाच पडली. त्यामुळे यामध्ये काही घोळ असल्याचा आरोप इतर उमेदवारांनी केला. मतदानाच्या दिवशीदेखील साडेपाचची वेळ असताना, १५०मध्ये साडेसातपर्यंत मतदान सुरू ठेवण्यात आल्याचा आरोप या उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणात हंडोरे यांनी घोळ केला आहे, असा आरोप करत उमेदवारांनी पहिल्या फेरीनंतर मतमोजणी बंद केली. तब्बल तीन तास या ठिकाणी या उमेदावारांचा गोंधळ सुरूहोता. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर काही वेळ मतमोजणी सुरू झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा उमेदवारांनी गोंधळ घातल्याने मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. पोलिसांनी धक्काबुक्की करणाऱ्या सात ते आठ जणांना ताब्यात घेतले. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली. केवळ या एका प्रभागातील गोंधळामुळे येथील मतमोजणी लांबणीवर पडली होती.
त्या पाठोपाठ मुलुंडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून गोंधळ उडाला होता. उमेदवारांच्या आसन व्यवस्थेबरोबरच त्या ठिकाणी शौचालयाची गैरसोय असल्याने, मनसे, भाजपा उमेदवारांनी केंद्रातच रोष व्यक्त करीत गोंधळ घातला. या वेळी पोलिसांसोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. त्यात दुपारपर्यंत सहाही जागांवर भाजपाचा विजय झाल्याने अन्य उमेदवारांकडून संशय व्यक्त करण्यात आला. दुपारी ३च्या सुमारास शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेसचे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुलुंडच्या मतमोजणी केंद्राबाहेर गोंधळ घातला होता. वाढती गर्दी लक्षात घेत, जास्तीचा फौजफाटा मागविण्यात आला होता. भाजपाविरुद्ध घोषणाबाजी सुरू झाल्याने, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तब्बल तीन ते चार तास हा गोंधळ सुरू होता. त्यांचे तक्रारअर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वीकारल्यानंतर येथील परिस्थिती नियंत्रणात आली. (प्रतिनिधी)
पत्रकारांचीही गैरसोय...
सायन मनपा शाळा, बॉम्बे सेंट्रल, मुलुंड, घाटकोपर, लोअर परळ, साईबाबा पथ मनपा शाळा, चेंबूर, सांताक्रुझ पूर्व प्रभात कॉलनी अशा मतमोजणी केंद्रांत पत्रकारांसाठी योग्य नियोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. अनेक ठिकाणी वारंवार तक्रार करूनदेखील त्यांच्यासाठी असलेल्या पत्रकार कक्षात मोबाइल नेण्यासही अडवणूक करण्यात आली.
टीव्ही, स्पीकर अशी कुठलीच सुविधा या ठिकाणी करण्यात आली नव्हती. शिवाय प्रभागातील उमेदवारांच्या मतमोजणीच्या निकालासाठी त्यांना ताटकळत राहावे लागले. त्यामुळे या केंद्रात पोलिसांसह निवडणूक कर्मचाऱ्यांसोबत पत्रकारांची शाब्दिक बाचाबाची झाली.
विक्रोळीमध्ये ११९च्या राष्ट्रवादी उमेदवार मनीषा रहाटे यांना विजयी घोषित केल्यानंतर, अन्य पक्षांच्या उमेदवाराने आक्षेप घेतला. त्यावर फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली. मात्र, फेरमतमोजणी का करावी, याचे योग्य स्पष्टीकरण ते देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा फेरमतमोजणीचा अर्ज नाकारण्यात आला.
तब्बल अर्धा तास गोंधळ सुरू होता, तर घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक १२८ आणि १२९मध्येही विजयी उमेदवारांविरुद्ध तक्रारींचा सूर उमटताना दिसला. त्यांच्या विजयावर संशय व्यक्त करत मतमोजणी यंत्रात बिघाड असल्याचा आरोप करण्यात आला. या वेळी शेकडो कार्यकर्त्यांच्या जमावामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात होती.
मात्र, पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करीत यावर नियंत्रण आणले. पूर्व उपनगरातील गोंधळ वगळल्यास अन्य ठिकाणी सुरळीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. काही ठिकाणी परिस्थिती चिघळण्यापूर्वी पोलिसांनी आवर घातला.