कोकणात मुसळधार
By admin | Published: June 17, 2015 02:57 AM2015-06-17T02:57:08+5:302015-06-17T02:57:08+5:30
नैऋत्य मोसमी पावसाला देशात आगेकूच करण्यासाठी अनुकुल स्थिती निर्माण होत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
मुंबई/पुणे : नैऋत्य मोसमी पावसाला देशात आगेकूच करण्यासाठी अनुकुल स्थिती निर्माण होत असल्याने राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. गेल्या २४ तासांत कोकणात मुसळधार पाऊस झाला. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील पाष्टे गावात ढगफुटी झाली.
पालघरला सर्वाधिक ७० मिमी पावसाची नोंद झाली. मान्सून राज्यात सक्रीय असल्याने कोकणात सर्वदूर तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडयात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पाऊस झाला. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढील ४८ तासांत कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी पावसाची पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामधील पाष्टे गावात सोमवारी रात्री १३६ मि.मी. पावसाची नोंद झाली. ढगफुटीमुळे गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याला मोठा पूर आला. पुराचे पाणी गावातील २० ते २५ घरात शिरले. चार घरे पडली आहे. साक्री तालुक्यातील डुक्करझिरे येथे वीज पडून तीन मुली जखमी झाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)