Exclusive : नव्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, राधाकृष्ण विखेंना गृहनिर्माण खात्यावर मानावे लागले समाधान
By अतुल कुलकर्णी | Published: June 16, 2019 08:11 PM2019-06-16T20:11:30+5:302019-06-16T22:03:01+5:30
राधाकृष्ण विखे-पाटील यांचा पहिल्याच फटक्यात अपेक्षाभंग झाला आहे.
- अतुल कुलकर्णी
मुंबई - काँग्रेस मधून भाजपमध्ये आलेल्या माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रकाश मेहता यांच्याकडील गृहनिर्माण खात्यावर समाधान मानावे लागले आहे. त्यांना किमान कृषीमंत्री व पणन खाते मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यांचा पहिल्याच फटक्यात अपेक्षाभंग झाला आहे.
प्रकाश मेहता यांना एमपी मिल कंम्पाऊंड प्रकरणी लोकपालांनी ताशेरे ओढल्यामुळे मंत्रीपद सोडावे लागले होते. या खात्यात सध्या तरी फार काही करण्यासारखे उरलेले नाही. त्यामुळे हे खाते देताना विखे यांच्याशी भाजपने अंतर ही राखून ठेवत निष्ठावंत भाजपवाल्यांना समाधान देण्याचा प्रयत्न केला आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांचे खाते डॉ. सुरेश खाडे यांना देण्यात आले असून, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांचे खाते प्रा. डॉ. अशोक उईके यांना देण्यात आले आहे. तर राज्यमंत्री योगेश सागर यांना राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडचे नगरविकास खाते देण्यात आले आहे. पाटील यांच्याकडेच खाते काढून त्यांनाही योग्य तो संदेश देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला आहे.