गटनेतेपदी राधाकृष्ण विखे पाटील
By Admin | Published: November 11, 2014 01:40 AM2014-11-11T01:40:09+5:302014-11-11T01:40:09+5:30
काँग्रेसच्या विधानसभेतील गटनेतेपदी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर उपनेतेपदी माजी राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज केली.
मुंबई : काँग्रेसच्या विधानसभेतील गटनेतेपदी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तर उपनेतेपदी माजी राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज केली. त्यामुळे गटनेतेपदावरूनच्या संदिग्धतेवर पडदा पडला.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या 6 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत गटनेता निवडण्याचे सर्वाधिकार सोनिया गांधी यांना देण्याचा
ठराव मंजूर करण्यात आला
होता. तेव्हापासून विखे
पाटील यांच्यासह माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, बाळासाहेब
थोरात, तरुणांमध्ये अमित
देशमुख यांच्या नावांची चर्चा
होती. अहमदनगर जिल्ह्यातील विखे-थोरात या पारंपरिक प्रतिस्पध्र्यापैकी कोण बाजी मारेल याबाबत उत्सुकता होती. विखे पाटील यांच्यासह काँग्रेसच्या काही आमदारांना फोडण्याच्या हालचाली भाजपाने सुरू केल्या होत्या.
त्यामुळेच सतर्क झालेल्या काँग्रेस श्रेष्ठींनी विखे पाटील यांच्यावर जबाबदारी टाकून बांधून ठेवले असे म्हटले जात आहे. उपनेतेपद
मिळालेले वडेट्टीवार हे माजी
मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती मानले जातात.
विखे पाटील यांच्या नियुक्तीबाबत समाधान व्यक्त करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आम्ही सगळेच त्यांना सहकार्य करू. (विशेष प्रतिनिधी)
राज्यातील भाजपा सरकारला काँग्रेसने पाठिंबा द्यावा, अशी भूमिका विखे यांचे वडील बाळासाहेब विखे पाटील यांनी घेतली आहे. याबाबत विचारले असताना राधाकृष्ण विखे म्हणाले की, ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. पक्षाची भूमिका नाही.
विखेंना पवारांचा टोला
काँग्रेसने भाजपाला पाठिंबा द्यावा, असे म्हणणारे बाळासाहेब विखे पाटील यांचे चिरंजीवच आता काँग्रेसचे गटनेते झाले आहेत. त्यामुळे भाजपा अन् काँग्रेसचा परस्पर समन्वय चांगला दिसेल, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हाणला.