धनगर बांधवांनी जो भंडारा उधळला तो...; राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 04:25 PM2023-09-08T16:25:28+5:302023-09-08T16:26:25+5:30
दुर्दैवाने आरक्षणाच्या बाबतीतले मुद्दे आहेत त्यात राजकीय हस्तक्षेपामुळे त्याचे गांभीर्य संपत चालले आहे असं विखे पाटील म्हणाले.
सोलापूर – भंडारा हा नेहमी पवित्र मानला जातो, भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली त्याचा विशेष आनंद आहे. प्रतिकात्मक भावना व्यक्त करण्याची भूमिका होती. त्यामुळे त्यांनी काही वावगं केले असं वाटत नाही. अचानक झालेल्या घटनेने सुरक्षा रक्षकांची जबाबदारी असते त्यांनी त्यांना पकडले. परंतु आंदोलकांवर कुठलाही गुन्हा दाखल करू नका, कारवाई करू नका अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्यात अशी प्रतिक्रिया सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अचानक घडलेल्या घटनेमुळे स्वाभाविक प्रतिक्रिया होती. कार्यकर्त्यांना मी समजावेन. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मागील युती सरकारमध्येही बरेच निर्णय घेतलेत. हा आरक्षण मुद्दा कोर्टात आहे. परंतु सगळ्या सवलती धनगर समाजाला लागू केल्या आहेत. कुठल्याही सवलतीपासून धनगर समाज वंचित ठेवला नाही. महामंडळाच्या माध्यमातून धनगर समाजासाठी १० हजार कोटींच्या योजना बनवल्या आहेत. धनगर समाजाच्या विकासासाठीही सरकार पाऊल टाकतंय असं त्यांनी सांगितले.
तसेच दुर्दैवाने आरक्षणाच्या बाबतीतले मुद्दे आहेत त्यात राजकीय हस्तक्षेपामुळे त्याचे गांभीर्य संपत चालले आहे. मराठा असो, धनगर समाज असेल त्यांच्या भावनांचा आदर आहे. परंतु या समाजाच्या पाठीमागे राहून राजकीय मंडळी त्याचा गैरफायदा घेतायेत. त्याने समाजाला फायदा मिळत नाही. परंतु आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोपही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
दरम्यान, प्रतिकात्मक आंदोलन करताना मी त्यांचे निवेदन घेत होतो, जर मी त्यांचे निवेदन नाकारले असते, मागणीकडे दुर्लक्ष केले असते तर ठीक होते. परंतु निवेदन घेताना त्यांनी भंडारा अंगावर टाकला, अचानक झालेल्या या घटनेमुळे सगळेच गोंधळून गेले होते. यात काही झटापट झाली. समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्याला मारहाण करण्याची भूमिका नव्हती. विनाकारण काही मंडळी वाद निर्माण करतायेत त्यांनी हे करू नये असंही राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
उद्धव ठाकरे बांधावर जाणे हा फार्स
उद्धव ठाकरे बांधावर जाणे हा फार्स आहे, मनोरंजनासाठी ते जातात. शेतकऱ्यांना ५० हजार एकरी भाव दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं ते मुख्यमंत्री असताना म्हटले होते. तुम्ही पीक विमा कंपन्यांच्या कार्यालयावर मोर्चे काढले. तुम्ही अडीच वर्षाच्या काळात काय केले? उद्धव ठाकरेंची भूमिका लोकांना माहिती आहे. त्यांना कुणी गांभीर्याने घेतील असं वाटत नाही अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली आहे.